होमपेज › Solapur › भिडे गुरूजींच्या सन्मानार्थ मोर्चा

भिडे गुरूजींच्या सन्मानार्थ मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

सांगली येथील शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शहर-जिल्ह्यातील हिंदू संघटना तसेच हिंदुत्ववादी राजकीय पक्षांच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा- कोरेगाव येथे जातीय दंगल घडली होती. या दंगलीस शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी जबाबदार असून त्यांना अटक करावी या मागणीसाठी दलित संघटनांनी एल्गार मोर्चा काढला होता व भिडे गुरूजींना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र या प्रकरणात भिडे गुरूजींचा काहीही संबंध नसून त्यांच्या सन्मानार्थ बुधवारी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर, विश्‍व हिंदू परिषद, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना तसेच शिवसेना, भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा काढण्यात आला.

भिडे गुरूजी वढू बुद्रुक येथे येणार असून सभा घेणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविणार्‍या विकी सौंडे याची सखोल चौकशी करावी, राहुल फटांगडे या तरुणाच्या खुनाची सखोल चौकशी करून दोषी असणार्‍यांवर सक्‍त कारवाई करावी, भिडे गुरूजींचा या प्रकरणात सहभाग नसतानादेखील त्यांचा या प्रकरणाशी संबंध असून त्यांच्यावर कारवाई करा म्हणणार्‍यांची सखोल चौकशी करावी तसेच भिडे गुरुजींवर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी शहर-जिल्ह्यातील हिंदू संघटना तसेच हिंदुत्ववादी राजकीय पक्षांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाची सुरुवात चार हुतात्मा पुतळा चौकातून करण्यात आली. हा मोर्चा  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्‍वर प्रशालेमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आला व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी मोर्चाला शिवसेना शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, हिंदू महासभेचे  माजी  राज्याध्यक्ष अभयसिंह इंचगावकर, दत्तात्रय पिसे, विश्‍व हिंदू परिषदेचे रवींद्र साळे, माजी नगरिसेविका रोहिणी तडवळकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी महेश धाराशिवकर, गुरुशांत धत्तुरगावकर, विजय पुकाळे, चंद्रिका चव्हाण, शुभांगी बुवा, पुरूषोत्तम कारकल तसेच मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


  •