Wed, Apr 24, 2019 12:23होमपेज › Solapur › खोट्या दस्तावेजांद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटला

खोट्या दस्तावेजांद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटला

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 10:07PMसोलापूर : प्रतिनिधी

 खोटे दस्तावेज सादर करून व डॉक्टरांचे खोटे अंदाजपत्रक (इस्टिमेेट) तयार करून मुख्यमंत्री निधी लाटण्याचा धक्कादायक प्रकार कुंंभारी येथील अश्‍विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्रात झाला आहे. अशाप्रकारे निधी लाटण्याचा प्रकार हा गेल्या तीन वर्षांपासून होत असल्याची फिर्याद सदर बझार पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक अजय हंचाटे यांनी सरकार पक्षाच्या वतीने दाखल केली आहे. 
या प्रकारामुळे गरजू व गरिबांसाठी वरदायिनी असलेल्या योजनेचा  गैरफायदा घेतला जात असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. 

यतीन विजयकुमार शहा (वय 37, रा. भंडारकवठे, दक्षिण सोलापूर), आप्पासाहेब बगले (53, रा. भंडाकरकवठे) व अश्‍विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्रातील अभिलेख हाताळणारे अधिकारी व कर्मचारी या आरोपींविरोधात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर माहिती अशी, कुंभारी येथील अश्‍विनी रुग्णालयात हृदयरोगी रुग्ण दाखल झाले होते. या रुणांचे उपचार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याकरिता  रुग्णालयातील अभिलेख  हाताळणार्‍या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी रुग्णांचे नातेवाईक व मित्रांसोबत संगनमत करून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनुप शहा यांचे  बनावट व खोटे दस्तावेज तयार करुन 18 नोव्हेंबर 2015 रोजी 1 लाख 80 हजार रुपये लाटले होते. तत्पूर्वी 23 ऑगस्ट 2015 रोजी आरोपींनी साडेतीन लाख रुपये मिळावे अशी शिफारस करूत डॉ. अनुप शहा यांच्या बनावट सहीद्वारे शासनास कागदपत्रे सादर केली होती. रुग्ण प्रकाश मारुती कासार यांनी 2014 साली हृदय शस्त्रक्रियेचा खर्च स्वत: भरला असतानादेखील आरोपी यतीन शहा याने 1 डिसेंबर 2015 रोजी शासनास तीन लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून मिळावे, अशी शिफारस केली होती. खोटे दस्तावेज सादर करुन गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुख्यमंत्री निधी लाटण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सोलापुरातील कोणकोणत्या रुग्णालयांंत मुख्यमंत्री निधी प्राप्त करून राज्य सरकारची फसवणूक झाली आहे, याचीदेखील तपासणी होणे गरजेचे असल्याची बाब यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. याबाबतचा सर्व तपशीलवार गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड हे करत आहेत. 

दुर्बल घटकातील लोकांना तत्काळ मदतीसाठी योजना

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आर्थिक व दुर्बल घटकातील लोकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. तथापि, या निधीचा गरजूंना लाभ न देता त्यांच्याकडून पूर्ण देयक वसूल करून त्यांच्या नावाची कागदपत्रे सादर करून या योजनेतून पैसे लाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आल्याने अशाप्रकारे निधी प्राप्त करणारी रुग्णालये आता संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. विशेष म्हणजे अत्यंत दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य पुरवले जाते. या योजनेचे व्यवस्थापन थेट मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते. तरीदेखील खोटे  दस्तावेज सादर करून थेट मुख्यमंत्री निधी लाटण्याचा प्रयत्न झाला आहे.