Sun, Jun 16, 2019 02:45होमपेज › Solapur › प्लॉट देण्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक

प्लॉट देण्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:32PMसोलापूर : प्रतिनिधी

ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारून परताव्याच्या बदल्यात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून शहरातील हजारो गुंतवणूकदारांना गरिमा फायनान्सच्या संचालकांनी कोट्यवधींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी काही तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

प्रकाश चंद्रशेखर डमामी (वय 41, रा. प्लॉट नं. 19, साम्राज्य नगर, शेळगी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन बनवारीलाल माधवसिंग कुशवाह, शिवराम माधवसिंग कुशवाह, बालकिशन माधवसिंह कुशवाह, शोभाराणी बनवारीलाल कुशवाह, बेनीसिंग नथीलाल कुशवाह (सर्व रा. जमालपूर, जि. धोलपूर, राजस्थान), राजेंद्र पुराण रजपूत (रा. बहरबली सैपु, पो. चितोरा, जि. धोलपूर, राजस्थान), रोहित फकीरचंद बनेत (रा. कुरूक्षेत्र, हरियाणा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनवारीलाल कुशवाह व इतर आरोपींनी गरिमा फायनान्स सुरु केले होते. सन 2011 मध्ये सोलापुरातील नवी पेठेतील ढंगे कॉम्प्लेक्स येथे गरिमा फायनान्सचे कार्यालय थाटून संचालक मंडळाने प्रकाश डमामी व फायनान्सच्या एजंटांना फायनान्समध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यांना परताव्याच्या बदल्यात प्लॉट देण्याचे आमिष दाखविले. 

त्यामुळे शहरातील अनेकांनी या फायनान्समध्ये गुंतवणूक म्हणून ठेवी ठेवल्या. सन 2015 मध्ये  ठेवींची मुदत संपल्यानंतर डमामी यांनी परतावा मागितला असता त्यांना संचालक मंडळाने कसलाही परतावा किंवा प्लॉट न देता त्यांच्यावर दबाव आणून राजीनामा देण्यास भाग पाडून ठेवीदारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता फायनान्सचे कार्यालय बंद केले.  म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात डमामी व इतर पाच लोकांची मिळून 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या ही हजारोंच्यावर असल्याने फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. 

गरिमा फायनान्सचे सोलापूर शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये सुमारे 2 हजार ठेवीदार असल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यामुळे या फायनान्सकडून ज्या ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे, अशा ठेवीदारांनी  आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी केले आहे.