Sun, Aug 25, 2019 04:40होमपेज › Solapur › मनपाचे पितळ उघडे; पूल, नाले तुंबले!

मनपाचे पितळ उघडे; पूल, नाले तुंबले!

Published On: Jun 09 2018 10:58PM | Last Updated: Jun 09 2018 8:59PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरात बुधवारपासून होत असलेल्या पावसामुळे नाले तुडुंब भरले असून पूलदेखील पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे महापालिकेच्या पूर्वमोसमी कामाचे पितळ उघडे पडले आहे. अनेक नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरले, तर सखल भागात पाणी साचले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले. मनपाची यंत्रणा यामुळे चांगलीच कामाला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.

पावसाळापूर्व खबरदारी म्हणून  मनपातर्फे नालेसफाई केली जाते खरी, पण पहिल्याच पावसात या कामातील फोलपणा दिसून येतो. हा दरवर्षीचा अनुभव आहे. बुधवारपासून शहरात पाऊस होत आहे.  रात्रीच्या वेळीदेखील  पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. शुक्रवारी कारंबा पूल पाण्याखाली गेला होता, तर रामवाडी पुलाखाली साडेतीन फूट इतके पाणी साचले होते. अशा स्थितीत या दोन्ही ठिकाणी नागरिक जीव धोक्यात घालून ये-या करीत होते.

पावसाचे पाणी साचलेल्या ठिकाणी मनपाची आपत्कालीन विभागाची यंत्रणा धावून जाते. 2740335 असा या विभागाचा दूरध्वनी क्रमांक आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून होणार्‍या पावसामुळे हा दूरध्वनी खणखणण्याच्या प्रमाणात वाढ झाली. नाल्यामध्ये साचलेला गाळ काढण्याबरोबरच पुलाखाली तसेच सखल भागात साचलेल्या पाण्याला जेसीबीच्या मदतीने वाट मोकळी करण्याचे काम आपत्कालीन विभागाची यंत्रणा करीत आहे. एवढेच नव्हे ड्रेनेजलाईन भरलेल्या ठिकाणी जेटिंग मशिनची मदत घेण्यात येत आहे. कारंबा पुलावरील पाणी आपत्कालीन यंत्रणेच्या दोन तासांच्या  कामानंतर लगेचच ओसरण्यास सुरुवात झाली. 

रामवाडी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी सुरु झालेले काम जवळपास नऊ तासांनी म्हणजे रात्री दहा वाजता पूर्ण झाले. शेळगी पुलाजवळील नागरी वसाहती, भैय्या वस्ती, विजापूर रोडवरील इंचगिरी मठ, प्रभाकर भवन, रंगभवननजीकच्या आयकरनगर, वसंतविहार, शेळगी येथील शिवदारे मंगल कार्यालयासमोरची वसाहत, होटगी रोडवरील पोस्टल कॉलनी, बुधवार पेठ साबळे हॉस्पिटलजवळ, चंडकनगर रोड आदी ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनपाच्या यंत्रणेकडून काम हाती घेण्यात आले. काही ठिकाणी भिंती कोसळल्या. तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने तिथेदेखील मदतकार्य करण्यात आले. या कामांनिमित्ताने आपत्कालीन मदत विभागाची कसोटी एकप्रकारे पणाला लागली आहे.  पावसाच्या पाण्यामुळे संकटाची स्थिती उद्भवली तर नागरिकांनी मनपाच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन मनपाने केले आहे.