Thu, Jun 27, 2019 10:28होमपेज › Solapur › वडिलाने मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून केला खून 

वडिलाने मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून केला खून 

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी

पैशाच्या कारणावरुन वडिलाने मुलास राहत्या घरी झोपेत असताना डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून त्याचा खून केल्याची घटना मजरेवाडीमधील महालक्ष्मीनगरात बुधवारी रात्री घडली. यात मुलीने पित्याविरुद्ध फिर्याद दाखल केल्याने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्वाती प्रकाश कांबळे (वय 21, रा. लक्ष्मीनगर) असे फिर्याद देणार्‍या मुलीचे नाव असून अंबादास सुरवसे असे खुनी पित्याचे नाव आहे, तर विश्‍वनाथ अंबादास सुरवसे असे मृताचे नाव आहे. 
बहिणीच्या पतीचे आणि दीराचे निधन झाल्याने ती आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी राहण्यास आली होती. आणखी दोन बहिणी असून यातील एकीचा विवाह झाला असून एक पुणे येथे राहणार्‍या मावशीकडे एक महिन्यापासून राहावयास गेली होती. 

वडील अंबादास हा काहीही काम करीत नव्हता. मृत भाऊ विश्‍वनाथ हा वीटभट्टीवर काम करुन पैसे जमा करीत होता. फिर्यादी बहिणीस कोणीच नसल्याने तिला छोटेसे दुकान काढून देण्यासाठी तो धडपड करीत होता. घर भागवून जमा केलेले पैसे तो वडिलांकडे देत होता.

पुणे येथे जाऊन दुकानासाठी लागणारा माल आणण्यासाठी विश्‍वनाथने बुधवारी रात्री जेवण करताना जमा केलेल्या पैशाची मागणी करुन पासबुकची मागणी वडिलांकडे केली. यावर वडिलाने माझे पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणाले. यावर जेवण करुन विश्‍वनाथ, फिर्यादी आणि आई झोपी गेले. 

मात्र रात्री अकरा वाजता विश्‍वनाथच्या आवाजाने फिर्यादीस, आईस जाग आली. उठून पाहिल्यानंतर वडील अंबादास हा विश्‍वनाथच्या डोक्यात, मानेवर कुर्‍हाडीने वार करीत असून डोक्यातून  रक्ताच्या धारा वाहत होत्या. दोघींनी अंबादासला थांबवले असता कुर्‍हाड तेथेच टाकून अंबादास घरातून निघून गेला. डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि जागेवरच विश्‍वनाथ तडफडत होता. 

फिर्यादीने लगेच भावाचा मित्र विष्णू गायकवाड यास फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिघांनी येऊन विश्‍वनाथ यास रिक्षात घालून मार्कंडेय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार चालू असताना रात्री विश्‍वनाथचा मृत्यू झाला.