Mon, Jun 17, 2019 19:04होमपेज › Solapur › तेलगीच्या मित्राचा सोलापुरात बनावट नोटांचा कारखाना

तेलगीच्या मित्राचा सोलापुरात बनावट नोटांचा कारखाना

Published On: Jan 31 2018 9:02PM | Last Updated: Jan 31 2018 9:02PMसोलापूर : श्रीकांत साबळे

सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने २३ जानेवारी रोजी बनावट नोटा तयार करताना अटक केलेल्या जियाउद्दीन दुरुगकर या वृध्दाचे देशात गाजलेल्या बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्याशी घनिष्ठ संबंध होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून दुरुगकर हा कोणा-कोणाच्या संपर्कात होता याचा तपास पोलिस करत आहेत. 

सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेतील जामा मशिदीच्यामागे जियाउद्दीन दुरुगकर नावाची व्यक्ती एका खोलीमध्ये कलर प्रिंटरच्या मदतीने चलनी नोटांची झेरॉक्स प्रिंट काढून त्या बनावट नोटा व्यवहारात आणणार असल्याची माहिती २३ जानेवारी रोजी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री दुरुगकर याच्या खोलीवर छापा मारला. त्यावेळी खोलीमध्ये प्रिंटरवर प्रिंट काढत असताना दुरुगकर मिळून आला होता. यावेळी खोलीची झडती घेतली असता खोलीत जवळपास १८ लाख रुपयांच्या बनावट नोटा बनविण्याचे साहित्य आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी दुरुगकर यास अटक केली.

यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून दुरुगकर याचे आता देशात गाजलेल्या बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीत तेलगी याच्याशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. दुरुगकर आणि तेलगी याच्यात १९९० च्या दशकात मैत्री होती. या मैत्रीतून दुरुगकर याने सोलापुरातील चौघा युवकांना तेलगीच्या मदतीने परदेशात पाठविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, याप्रकरणात दुरुगकर याने संबंधित युवकांना परदेशात न पाठविताच पैसे घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणात दुरुगकर याच्यावर जेलरोड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 

दरम्यान, दुरुगकर याने तेलगीच्या असलेल्या संबंधातूनच बनावट नोटा प्रकरणात लक्ष घातले तर नव्हते ना, असा प्रश्‍न पोलिसांना सतावत असून पोलिसांनी तशादृष्टीने तपासाला सुरूवात केली आहे. काही महिन्यांपूर्वीच तेलगीचा मृत्यू झाला आहे. परंतु तेलगीबरोबरच अन्य कुणी साथीदार दुरुगकरच्या संगतीत होते का याचाही तपास पोलिस करत आहेत. 

सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चानकोटी हे अधिक तपास करीत आहेत.