Mon, Mar 25, 2019 02:48
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › जिल्हानिहाय होणार रोजगार मेळावे

जिल्हानिहाय होणार रोजगार मेळावे

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 8:58PM
 सोलापूर  प्रतिनिधी
स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये व स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांकडे असलेल्या कौशल्याचा योग्य ताळमेळ करून रोजगार देण्यासाठी शासनाने आता जिल्हानिहाय स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील मोठे मध्यम उद्योग, विविध औद्योगिक संघटना तसेच व्यापारी आस्थापना, हॉटेल्स, रुग्णालये, मॉल्स, बांधकाम व्यवसाय यांच्याकडून आवश्यक असणार्‍या मनुष्यबळाची निकड शैक्षणिक पात्रता, किमान कौशल्य या बाबी संकलीत करुन उद्योग संचालनालय व कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास विभागाने आता समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये रोजगारासाठी इच्छुक असणार्‍या युवक युवतींच्या नोंदणीसाठी आयुुक्‍त कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून तयार करण्यात आलेल्या महास्वयंम इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील मोठे उद्योग व इतर घटकांना त्याठिकाणी निमंत्रित करून प्रत्यक्ष मेळाव्याचे आयोजन करून मुलाखती पार पाडून योग्य उमेदवार मिळवून देण्याची जबाबदारी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाला देण्यात आली आहे.
यासाठी स्वतंत्र कार्यशाळा परिषदा आयोजित करुन त्यामध्ये स्वयंरोजगारासाठी आवश्क असणार्‍या शासनाच्या विविध योजनांची माहिती विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन, योजनांची माहिती पत्रके, भिंती पत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, विविध आर्थिक विकास महामंडळाचे स्टॉल लावण्याची जबाबदारी ही कौशल्य विकास विभागावर देण्यात आली आहे.