Fri, Apr 19, 2019 13:55होमपेज › Solapur › शिक्षणाधिकार्‍यांना झापले!

शिक्षणाधिकार्‍यांना झापले!

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:48PMसोलापूर : प्रतिनिधी

शिक्षण विभागातील अंतर्गत वादामुळे खासगी प्राथमिक शाळांत कार्यरत असणार्‍या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनासाठी आलेला 65 लाखांचा निधी राज्य शासनाकडे परत गेल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रकाशित झाल्यानंतर याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांची चांगलीच कानउघडणी केली. 

परत गेलेला निधी पुन्हा मिळविण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांना मागणीपत्र देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकार नसतानाही खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी मंजुरी घेण्याचा हट्टाहास शिक्षणाधिकार्‍यांनी धरला. त्यामुळे हा निधी वेळेत खर्च न होता राज्य शासनाकडे निधी परत गेला. याबाबत दै. ‘पुढारी’ने दोन दिवस वृत्त प्रकाशित केल्यानंतर याप्रकरणाचा संपूर्ण सोक्षमोक्ष डॉ. भारूड यांनी लावण्याचा प्रयत्न केला. 

परत गेलेला निधी पुन्हा जिल्हा परिषदेस मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांना विनंती पत्र पाठविण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. डॉ. भारूड यांनीच यासाठी पुढाकार घेतला असल्याने परत गेलेला निधी पुन्हा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

शिक्षण विभागात गत अनेक वर्षांपासून चुकीची प्रशासकीय पद्धत रुजविण्यात आली असून याप्रकरणी चुकीची प्रणाली राबविणार्‍या संबंधित दोन अधिकार्‍यांना नोटिसा देण्याची भूमिका शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.