Mon, Mar 25, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › संपामुळे एस.टी.ला दीड कोटीचा फटका

संपामुळे एस.टी.ला दीड कोटीचा फटका

Published On: Jun 09 2018 10:58PM | Last Updated: Jun 09 2018 9:09PM सोलापूर : प्रतिनिधी 

वेतनवाढीसाठी एस.टी. कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने दोन दिवसांत एस.टी.च्या शेकडो फेर्‍या विस्कळीत झाल्या. त्यामुळे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले असल्याची माहिती सोलापूर विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.

राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलेली पगारवाढीची घोषणा ही फसवी असल्याने गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता तेरा एस.टी. कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामध्ये राज्यभरासह सोलापूर डेपोच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.  त्यामुळे सोलापूर  शहर व जिल्ह्यातील  बहुतांश एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्या.
सोलापुरात काल दिवसभरात एकूण 1677 फेर्‍या होणे अपेक्षित होते. मात्र, त्यातली तब्बल 1507 फेर्‍या रद्द झाल्या. तर आज दिवसभरात 1144 (सायंकाळी 5 पर्यंत) फेर्‍या होणे अपेक्षित होेते; मात्र संपामुळे 998 फेर्‍या रद्द झाल्या. 

काल आणि आज दोन दिवसांमध्ये केवळ 316 फेर्‍या झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.राज्याच्या तुलनेत सोलापुरात मात्र एसटीचा संप अतिशय कडकडीत नाही. शिवाय संपाला कुठेही गालबोट लागले नाही. एसटी कामगार सेना या संघटनेच्या सदस्यांनी या संपात सहभाग घेतला नाही. त्यामुळे ते कर्मचारी कामावर हजर राहिले आणि त्या फेर्‍या सुरु राहिल्याने सोलापूर तालुका विभागात सुमारे 44 टक्के फेर्‍या सुरु राहिल्या. उर्वरित जिल्ह्यातही दहा टक्के एसटीच्या फेर्‍या सुरु राहिल्या.
आज दिवसभरात सांगोला येथे एसटीच्या सर्वाधिक 23 फेर्‍या झाल्या. त्यानंतर पंढरपूर विभागात 7 फेर्‍या झाल्या. मात्र उर्वरित विभागात एसटीच्या फेर्‍या झाल्या नाहीत. त्या तुलनेने सोलापूर विभागात अर्थात दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील काही गावांमध्ये एसटीच्या फेर्‍या चांगल्या प्रमाणात होत्या.