Tue, Apr 23, 2019 22:01होमपेज › Solapur › आरोग्य विभागातील वाहनचालक नऊ महिन्यांच्या पगारापासून वंचित

आरोग्य विभागातील वाहनचालक नऊ महिन्यांच्या पगारापासून वंचित

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

आरोग्य विभागातील वाहनचालक प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेवर 2005 पासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. वाहनचालकांच्या कामाचे 24 तास असून त्यांना ड्रेसकोड नाही, विमा नाही, वाहनचालकांचे वेतन वर्षातून फक्त 2 वेळा होते. या आरोग्य विभागातील 102  वाहनचालकांचे सुमारे 9 महिन्यांपासून वेतन अदा केले नाही, असे निवेदन पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांना वाहनचालकांकडून देण्यात आले.

 शासनाकडून प्रति वाहनचालक यांना रु. 11 हजार 497 याप्रमाणे वेतन अदा केले जाते. परंतु संबंधित ठेकेदाराकडून कोर्‍या व्हाऊचरवर स्वाक्षर्‍या घेऊन त्यांच्या खात्याला फक्त 6 हजार  वेतन अदा केले जाते.

ठेकेदार नेमल्यामुळे 5 हजार 497  प्र्रति वाहनचालकामागे त्यांना मिळत असून ही ठेकेदारी पध्दत अतिशय अन्यायकारक असून वाहनचालकांवर सुमारे 10 वर्षांपासून अन्याय होत आहे. संबंधित वाहनचालकांना 9 महिन्यांचे वेतन अदा न केल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. व्याजाने पैसे काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची परिस्थिती वाहनचालकांवर आली असून चालू काळात 5 ते 6 हजार रुपयात कुटुंब चालविणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे वाहनचालक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित ठेकेदाराने शासनाला जी माहिती पाठविली आहे ती सर्व चुकीची असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. तरी लोकशाहीच्या काळात शासनाने नेमलेल्या ठेकेदारीमुळे वाहनचालकांचा नाहक बळी जाऊ नये. तरी शासन वाहनचालकांसाठी वेतनाबाबत जी तरतूद करीत आहेत ते ठेकेदारामार्फत न देता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वाहनचालकांना नियुक्ती मिळावी. तरी वाहनचालकांवर होणारा अन्याय, पिळवणूक थांबवावी व वरील वाहनचालकांवरील समस्या सोडवावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रभाकर देशमुख, पप्पू पाटील, विकास जाधव, गणेश शिंदे उपस्थित होते.