Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Solapur › ड्रेनेज योजनेचा विषय ठरला बहुचर्चित !

ड्रेनेज योजनेचा विषय ठरला बहुचर्चित !

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 10:49PMसोलापूर : प्रतिनिधी

180 कोटींच्या मलनिस्सारण (ड्रेनेज) योजनेचा विषय बहुचर्चित ठरत आहे. या योजनेचा ‘लाभ’ हा केवळ ‘मर्यादित’जणांना न होता तो सर्वांना व्हावा या ‘उदार’मतवादी धोरणामुळेच 31 मार्च रोजी मनपाची सभा तहकूब झाल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात रंगली आहे.  त्यामुळे ‘लाभ’  होईल की नाही, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सत्ताधार्‍यांमधील गटबाजीमुळे मनपाच्या सभा वादग्रस्त ठरत आहेत. परस्परविरोधी भूमिका, धोरणामुळे सत्ताधार्‍यांची अब्रू अनेकदा वेशीला टांगली गेली. यामुळे भाजपची मोठी बदनामी झाली, पण आता हा पक्ष ‘इंटरेस्ट’संबंधी एका विषयावरून ‘उदार’ धोरणामुळे चर्चेत आला आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेसाठी सोलापूरसाठी 180 कोटींची ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे. 

या योजनेसाठी शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया राबवून प्रशासनाने हा विषय मंजुरीसाठी 31 मार्च रोजीच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. पण ही सभा तहकूब करण्यात आली. सभा तहकुबीमागे ‘अर्थ’पूर्ण कारण असल्याची जोरदार चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. कुठल्याही मक्त्याला मंजुरी देताना काही प्रथा व धोरण असल्याचे सांगितले जाते. मग 180 कोटींच्या ड्रेनेज योजनेबाबतचा विषय अपवाद  राहू  शकत नाही, असा मुद्दा आहे. धोरणावरून नवा वाद उद्भवल्याचे सांगण्यात येते.

 याविषयी ‘एकमत’ न झाल्याने या विषयासंबंधित सभा जाणीवपूर्वक तहकूब केल्याची सांगण्यात येत आहे. ही सभा तहकूब केल्याच्या तीन दिवसांनंतर शासनाने आयुक्तांना पत्र पाठविले आहे.  ड्रेनेज योजनेबाबत मनपाचा ठराव 7 एप्रिलपर्यंत न झाल्यास मनपाला प्रकल्पाची गरज नाही, असे गृहित धरून शासनाला योजना रद्द करावी लागेल, असा  इशारा या पत्रात देण्यात आला आहे. 

त्यामुळे तातडीने सभा बोलावून ठराव करणे अपेेक्षित आहे. पत्र येऊन दोन दिवस झाले तरी सभा घेण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. जरी 7 एप्रिलला सभा घेऊन या विषयाबाबत मनपाने सोपस्कर पूर्ण केल्यास योजना परत जाण्यापासून रोखणे शक्य होणार आहे.