Sun, May 26, 2019 00:43होमपेज › Solapur › ब्लॉग : साखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी...

साखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी...

Published On: Feb 19 2018 12:19PM | Last Updated: Feb 19 2018 12:19PMसंतोष आचलारे

भाजपाच्या बिर्‍हाडात घुसून जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजय शिंदे यांची निवड होऊन मार्च महिन्यात वर्ष सरत आले आहे. तरीही जि.प. अध्यक्ष शिंदे यांचा भाजपाच्या घरात  अधिकृत गृहप्रवेश न झाल्याने साखरपुड्याच्या उत्साहातच वर्ष सरलं,  पण लग्‍नाचा मुहूर्त लागणार तरी कधी, असा प्रश्‍न उपस्थित होतआहे. विकासात राजकारण नाही, अशी  भूमिका जरी मामांनी घेतली असली, तरी विकासाच्या नावाने एकाही धन्याचा कुंकू  न लावता अनेक घराचा संसार करण्याचा प्रकार होत असल्याची तिखट प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहे.

माहेरची ओढ अजूनही मामांना कायम असून एक पाय माहेरात, तर एक पाय सासरी असल्याचेही गमतीने म्हणण्यात येत आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री  सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार  यांनी वर्षभरापूर्वी जि.प. अध्यक्षांचा अधिकृत गृहप्रवेश होण्याचे संकेत दिले होते. यालानवरी मामानेही सहमती  दर्शविली होती. नंतरच्या काळात मात्र सासरचा वचक सैल झाल्याने माहेरी चकरा मारण्याचा प्रकार सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. पंढरीच्या दारी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या माहेरच्या कार्यक्रमासाठी मामांनी सासरच्या घरातील दोन महत्त्वाचे कार्यक्रम सोडून माहेरच्या कार्यक्रमात आपल्या मूळ घरच्या कार्यक्रमास हजेरी लावली.  माहेरची ओढ असणे स्वाभाविक आहे, मात्र दिल्या घरातील नियम व प्रथा सोडून रोजच माहेरची वाढणारी ओढ सासरच्या घराला धोकादायक ठरली आहे. त्यामुळे संसार दीड वर्षात  टिकेल की नाही, असाही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. आतापर्यंत साखरपुड्यातील वर्षभरात झालेल्या सर्व कार्यक्रमात माहेरच्या कार्यक्रमालाच जास्त उपस्थित  असल्याचे दिसून आले  आहे. जिल्हा परिषदेच्या सासरी असलेल्या आनंदी नणंदेला मात्र मुद्दामहून जाऊबाईंचा त्रास होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे सासरी घरभेदीचे वातावरण दिसून येते.

आनंदी नणंदेला आता घरातच कवडीचीही किंमत थोरल्या जाऊबाई देत नसल्याने नणंदेने आपल्या देवाभाऊकडे पुन्हा चकरा वाढल्या आहेत. मात्र   गृहलक्ष्मी आपल्याच घरात कायम रहावी, यासाठी देवाभाऊंही नणंदेच्या तक्रारी या कानाने ऐकून, त्या कानाने बाहेर सोडून वेळ मारुन नेत असल्याचेही गंमतीने सांगण्यात येते. दीड वर्षानंतर  पुन्हा जिल्हा परिषदेच्या सारीपाटाच्या संसारात पुन्हा कांही तरी गडबड होण्याची शक्यता असल्याने केवळ साखरपुड्यातच अर्धा संसार करण्याचाही डाव असल्याची शक्यता व्यक्‍त  होत आहे. 

ऐनवेळी लागलेल्या लग्‍नात भावकीचे नाते जोडलेल्या काँग्रेसच्या सिध्दाभाऊंचाही हात दीड वर्षानंतर पुन्हा सुटणार असल्याचीही  चर्चा आहे. दीड वर्षानंतर पुन्हा पहिला घरोबा  पूर्वपदावर येणार असल्याचे भाकित असल्याने तोपर्यंत असंच उघड्यावरच संसार चालणार असल्याचेही चर्चा होत आहे. त्यामुळे भाजपाच्या घराची चिंता वाढू लागली आहे. दीड  वर्षाच्या काळात घर फुटण्यापेक्षा अधिकृत विवाहाचा बार फोडण्याचे धाडस आता भाजपाच्या घरातील कर्त्याला करावे लागणार आहे.