होमपेज › Solapur › पंढरपूर शहर -तालुक्यात भाजप-राष्ट्रवादी जोमात

पंढरपूर शहर -तालुक्यात भाजप-राष्ट्रवादी जोमात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वारे वहायला लागले असताना पंढरपूर शहर आणि तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय झालेले आहेत परंतु काँग्रेस पक्षात अद्यापही सामसूम असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत पंढरपुरातून काँग्रेसचे उमेदवार आ. भारत भालके असण्याची शक्यता असून लोकसभेला शिंदे परिवारातील व्यक्‍ती असेल असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमध्ये मात्र निवडणुकीच्यादृष्टीने कसलीही हालचाल  दिसत नाही. 

लोकसभा निवडणुका आता जेमतेम एक वर्षावर तर विधानसभा निवडणुका दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या आहेत. राजकीय चर्चा पाहिल्यानंतर लोकसभा निवडणुका जानेवारी 2019 च्या जवळपास होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणुकाही एकाचवेळी घेतल्या जातील असेही बोलले जात आहे. या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. पंढरपूर शहर हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर शहरात भा. ज. प.ने  मोठे मताधिक्य मिळवले होते. त्याचबरोबर शहर भाजपचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी शहराची सूत्रे हाती घेतल्यापासून भाजपचे काम चांगल्या प्रकारे वाढले आहे. विविध सेलच्या कार्यकारिणी निवडीपासून शाखा सुरू करण्यापर्यंत भाजप सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमूख यांनी पंढरपूर शहर आणि माढा लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ग्रामीण भागातही वन बूथ, टेन युथ ही संकल्पना राबवण्याचे काम तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांनी हाती घेतले आहे. पक्षाचे काम आणि ध्येय धोरणे ग्रामीण भागात पोहोचवण्याचे काम श्रीकांत बागल यांच्यामाध्यमातून चांगल्या प्रकारे सुरू आहे. आ. प्रशांत परिचारक हेही सध्या भाजपचे सहयोगी सदस्य असल्यामुळे त्यांच्या मदतीनेही शहर आणि ग्रामीण भागात भाजपने हात-पाय पसरले आहेत.  मागील वर्षी तालुका पंचायत समितीवर पहिल्यांदाच  कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. 

दुसर्‍या बाजुला राष्ट्रवादी काँग्रेसही गेल्या सहा महिन्यात पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यासह ग्रामीण भागात प्रचंड सक्षमपणे काम करताना दिसत आहे. येत्या 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन जिल्ह्यात येत आहे. त्याअनुषंगाने पंढरपूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक सक्रिय झालेले आहेत. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही कोणतीही मोठी शक्ती पाठीशी नसताना मोठ्या जोमाने काम करताना  दिसत आहेत. 

या दोन्ही पक्षांचे काम अशा प्रकारे जोमाने सुरू असताना पंढरपूर शहरात आणि ग्रामीण भागातही काँग्रेस पक्षाला मात्र मरगळ आल्याचे दिसून येत आहे. विशेषत: पंढरपूर शहरात काँग्रेसचे काहीही काम दिसत नाही. गेल्या वर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला दारूण अपयश आले. मात्र यानंतर पक्षात कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. काही किरकोळ स्वरूपाचे जयंतीचे कार्यक्रम वगळता जनतेपर्यंत पक्षाला घेऊन जाईल असे कार्यक्रम झाले नाहीत. पक्षात नवीन कार्यकर्त्यांना सामील करून घेण्याचाही प्रयत्न झालेला दिसत नाही. ग्रामीण भागात युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन नागणे यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर किमान काही आंदोलने झालेली आहेत. 
परंतु शहरात अपेक्षेनुसारस पक्षाचे काम दिसून येत नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे हे आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असतील तर त्यांच्या प्रचारासाठी शहरात सक्षम फळी असल्याचे दिसत नाही. आ.भारत भालके यांचा गट पक्षापेक्षा भालके गट किंवा विठ्ठल परिवार म्हणून अधिक सक्रिय आहे. मात्र त्याचा फायदा काँग्रेसला कितपत होतो हे पहावे लागणार आहे. सुशिलकुमार शिंदे  किंवा आ. प्रणिती शिंदे यांनीच पंढरपूर शहरात आता लक्ष घालून पक्षाची घडी बसवावी अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. अन्यथा लोकसभा निवडणुकीतच पक्षाला या सुप्तावस्थेची किंमत मोजावी लागेल असे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
 


  •