Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Solapur › जिल्ह्यात वादळी वार्‍याचा पिकांना फटका

जिल्ह्यात वादळी वार्‍याचा पिकांना फटका

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 10:09PMसोलापूर :

ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर वादळी वार्‍यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. अक्कलकोट येथे वृक्ष कोसळला तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा बासलेगाव येथे रविवारी सायंकाळी झालेल्या तुफान वादळी वारा व अवकाळी पावसाने जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वर्गावर मोठे वडाचे झाड उन्मळून कोसळले. 

यामुळे विद्युत खांबावरील विद्युत तारा तुटल्या आहेत. सुदैवाने ही घटना रविवारी घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  सदर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोलीवरील 15 ते 20 पत्र्यांचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रात्री घडल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.कणबस येथे विजेचे पोल पडले कणबस (ता. दक्षिण सोलापूर) येथे वादळी वार्‍यामुळे विजेचे आठ पोल उन्मळून पडले. काही ठिकाणच्या घरांवरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विजेचा पोल पडल्याने अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. 

माढ्यात मोठे नुकसान  

मंगळवारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात कुर्डुवाडी आगाराच्या वैराग ते कुर्डुवाडी या एस.टी. बसचा वैराग ते मालवंडी दरम्यान टपाचा पत्रा उचकटला. यावेळी बसमध्ये बारा ते पंधरा प्रवासी होते. यावेळी कोणालाही दुखापत झाली नाही. महादेव भीमराव फरड रा. पडसाळी यांची एक जर्सी गाय व एक म्हैस वीज पडून ठार झाली. तर भूताष्टे येथे विद्युत तारा तुटल्याने किसन दासू यादव यांच्या चार शेळ्या मृत्युमुखी पडल्या. रणदिवेवाडी येथे चंद्रकांत रणदिवे यांच्या झाडाखाली बांधलेली म्हैस झाड अंगावर पडून गंभीर जखमी झाली. मानेगाव व परिसरात झालेल्या वादळात संतोष गुलाबराव देशमुख यांची चार एकर द्राक्ष बाग, बेदाणा शेडवरील कागद व शेडमध्ये टाकलेला चार ते पाच टन बेदाण्याचे पावसाने नुकसान झाले. भाऊसाहेब लांडगे यांच्या दोन एकर द्राक्ष बागेचे नुकसान होऊन बेदाणा शेडमधील संपूर्ण मालाचेही मोठे नुकसान झाले आहे. बेदाणा शेडसाठी वापरला जाणारा कागद महाग असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच नारायण कृष्णा देशमुख यांच्या एक एकर आंबा बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. 

कुर्डु येथील सत्यवान पाटमस यांच्या घराचे पत्रे उडून घराचे नुकसान झाले आहे. वेताळवाडीच्या श्रीकृष्ण विद्यालयावरील पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले. टेंभुर्णी, अकुंभे, आहेरगाव, सापटणे(टे), वरवडे, व्होळे  येथील केळीच्या बागांचे व कांदा पिकाचे  नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत ताराही तुटल्या आहेत. तालुक्यातील अनेकांच्या घरावरील व हॉटेलवरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच झाडे मोडून पडली आहेत.