Tue, Mar 19, 2019 05:12होमपेज › Solapur › सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले; दोषींविरुद्ध एप्रिलपर्यंत कारवाई

सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले; दोषींविरुद्ध एप्रिलपर्यंत कारवाई

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 10:12PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचे काम अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत चांगले दिसून आले आहे. तरुण असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे अभ्यासू व कर्तव्यदक्ष असल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. पंचायत राज समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारी व समितीने काढलेल्या त्रुटींवर एप्रिलपर्यंत योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी त्यांच्या समवेत समितीचे सदस्य दिलीप सोपल उपस्थित होते. 

तीनदिवसीय दौर्‍याची माहिती देताना पारवे म्हणाले, पंचायत राज समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद अधिकार्‍यांसमवेत दोन दिवस बैठक घेऊन काही विषयांच्या त्रुटीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेतली. या त्रुटीचा अहवाल समितीकडे प्राप्त होणार आहे. समाधानकारक कामगिरी नसल्यास किंवा गैरप्रकार प्रकरणी कारवाई झाली नसल्याचे दिसून आल्यास याप्रकरणी मुंबईत संबंधित विभागांच्या सचिवाची साक्ष समितीसमोर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपूर्ण स्वच्छता अभियान, घरकुल योजना, सर्व शिक्षा अभियान आदी उपक्रमांत सोलापूर जिल्हा अग्रेसर ठरला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे काम चांगले असल्याचे दिसून आले आहे. 
मात्र, ज्याठिकाणी गैरप्रकार दिसून येत आहेत त्याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. बोगस अपंग प्रमाणपत्रांआधारे काही शिक्षकांच्या बदल्या झाल्याच्या प्रकरणात बोगस प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी संबंधित बोगस प्रमाणपत्रे देणार्‍या डॉक्टरांची मुंबईत साक्ष लावून कारवाई करण्यात येईल. माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेत अनियमितता केल्याने याप्रकरणी शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांना जाब विचारण्यात आला आहे. त्यांच्याही साक्षी सचिवांसमोर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी ग्रामपंचायतीने सांडपाण्यावर दीड एकर ऊस लागवड करून दीड लाखांचे उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळवले आहे. हा उपक्रम अत्यंत आदर्शवत आहे. येथील ग्रामसेवक वेतनवाढीसाठी पात्र ठरले आहेत. 

काही जि.प. शाळेत गुणवत्ता व शिक्षकांची उपस्थिती चांगली दिसून आली. काही शिक्षकांना सामान्य बाबीही माहिती नसल्याचे दिसून आले. अशा शिक्षकांना काम सुधारण्याची तंबी दिली. पन्नास हजार रुपये पगार शिक्षकांना आहे. मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी सामाजिक उपक्रमात मदत करावी, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत. पाणीपुरवठा योजना पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठका आयोजित करुन हा प्रश्‍न तातडीने सोडवावा,  असे आदेश देण्यात आले आहेत.