Mon, Jul 22, 2019 05:25होमपेज › Solapur › घरकुल लाभार्थ्यांची वाळूसाठी त्रेधातिरपिट

घरकुल लाभार्थ्यांची वाळूसाठी त्रेधातिरपिट

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 9:49PM सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात सध्या वाळू लिलाव बंद असल्याने बेघर लोकांसाठी शासनाच्यावतीने देण्यात येणार्‍या विविध घरकुल योजनांना आता चांगलीच घरघर सुरु झाली आहे. दुसरीकडे विविध विकासकामांवरही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 पर्यंत देशातील सर्वच बेघर लोकांना हक्काची आणि पक्की घरे देण्याचे धोरण ठेवले असून त्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र या घरकुलांसाठी आता वाळू वेळेवर उपलब्ध होत नसल्याने घरकुलांची कामे आता रखडली आहेत. अनेकांनी वाळूला पर्याय म्हणून दगडाची डस्ट वापरणे पसंत केले आहे. अनेकांनी कमी दर्जाची वाळू वापरुन काम पूर्ण करण्याची धडपड सुरु केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावरही याचा विपरित परिणाम दिसून येत आहे. शासनाच्या विविध विभागांच्यावतीने अनेक विकासकामे जिल्ह्यात सुरु आहेत. त्यांनाही वाळूची गरज असली तरी वाळू वेळेत उपलब्ध होऊ शकत नाही. अनेकवेळा दामदुप्पट दर देऊन वाळू विकत घेण्याची वेळ बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांवर आली आहे. त्यामुळे किमान घरकुल आणि शासकीय कामांना तरी वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.