Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Solapur › पुनर्वसन होऊनही गावे अजून वार्‍यावरच

पुनर्वसन होऊनही गावे अजून वार्‍यावरच

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 10:44PMबार्शी : गणेश गोडसे 

गावाच्या पुनर्वसनास अठरा वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही त्या गावातील अनेक कुटुंबे वार्‍यावर तसेच विविध सोईसुविधांपासून वंचित असून संबंधित प्रशासन अद्यापही याबाबत गंभीर नसल्यामुळे पुनर्वसन झालेल्या तांदुळवाडी (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांमधून याबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. 

अठरा वर्षे सरली
बार्शी तालुक्याच्या पूर्व भागातील बार्शी-उस्मानाबाद मार्गावर शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने पिंपळगाव (ढाळे) मध्यम प्रकल्पाच्या निर्मितीमुळे पुनर्वसित झालेल्या गावातील लोकांना शासनाने व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसह प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र भूसंपादन होऊन 18 वर्षांचा कालावधी उलटून जाऊनही संबंधित विभागाचे अधिकारी येथील विविध प्रश्‍नांकडे फारसे गांभीर्याने पहात नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्राचे लोकायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून नाराजी व्यक्‍त करत कामे व येथील समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. 

अनेकजण बेघर
पिंपळगाव (ढाळे), ता. बार्शी येथील मध्यम प्रकल्पाच्या नव्याने झालेल्या निर्मितीमुळे तांदूळवाडी या गावातील अनेक कुटुंबे बेघर झालेली आहेत. लघुपाटबंधारे विभाग क्रमांक 1 सोलापूर, भीमा कालवा मंडळ सोलापूर अंतर्गत मध्यम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. पिंपळपान मध्यम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या तांदुळवाडी गावाच्या पुनर्वसित गावठाणमध्ये अनेक नागरी सेवा-सुविधांची कामे अठरा वर्षानंतरही पूर्ण करण्यात आलेली नाहीत. एखाद्या गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर त्या गावात शासन निकषानुसार वेगवेगळी विकास कामे राबवणे, दैनंदिन गरजेच्या वस्तू निर्माण करणे, या बाबी होणे शासनास बंधनकारक असते. नवीन ठिकाणी पुनर्वसन झाल्यावर तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या मदतीने गाव निर्मलग्राम करण्याचा ठाम निर्धार करून तो यशस्वी करून दाखवला आहे. गाव निर्मलग्राम होऊनही शासन स्तरावर याबाबत सकारात्मकता दाखवली जात नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी या गावाच्या रखडलेल्या विकास योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरत आहे. 

गावातील विकासकामे रखडण्यासाठी नेमकी कोणती अडचण निर्माण होत आहे व त्यावर कसा मार्ग काढून उर्वरित कामे पूर्णत्वाकडे नेता येतील, यादृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकारी पातळीवर प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.