Tue, Jul 23, 2019 04:48होमपेज › Solapur › जिल्हा बँकेचे २१हजार शेतकरी ओटीएस योजनेच्या प्रतीक्षेत

जिल्हा बँकेचे २१हजार शेतकरी ओटीएस योजनेच्या प्रतीक्षेत

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 9:07PM

बुकमार्क करा

सोलापूर : महेश पांढरे    

 राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेतील दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दीड लाख रुपयांच्या वरती कर्ज असणारे जिल्हा बँकेकडील 21 हजार शेतकरी ओटीएस अर्थात एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच त्यांच्या याद्या तयार करण्यात येणार असून उर्वरित रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 21 हजार 758 शेतकरी हे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेले आहेत. त्यांच्या कर्जफेडीसाठी येत्या 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम शेतकर्‍यांनी भरल्यानंतर त्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकर्‍यांच्या याद्या पडताळणीचे काम सुरु आहे. त्यामुळे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या याद्या तपासून पुन्हा शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत. या याद्या त्या त्या गटसचिवांकडे सोपविण्यात येणार आहेत. त्यानंतर अशा पात्र शेतकर्‍यांनी उर्वरित रक्कम बँकेला कर्जापाटी भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतर जे जे शेतकरी ही रक्कम भरुन घेतील त्या त्या शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिधंबक अविनाश देशमुख यांनी दिली आहे.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत युध्दपातळीवर याद्या तपासण्याचे काम सुरु असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिली आहे. दुसरीकडे उर्वरित रक्कम कोठून भरणार, असा प्रश्‍न अनेक शेतकर्‍यांनी आता उपस्थित केला आहे.