Thu, Jun 27, 2019 18:07होमपेज › Solapur › जिल्ह्यात तीन हजारजणांना मृत्यूनंतरही बघायचे जग!

जिल्ह्यात तीन हजारजणांना मृत्यूनंतरही बघायचे जग!

Published On: Jun 09 2018 10:58PM | Last Updated: Jun 09 2018 9:06PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

मृत्यूनंतरही जग पाहण्यासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तसेच, फक्‍त इच्छा व्यक्‍त करुन चालणार नाही, तर मृत्यूनंतर जवळच्या माणसाला सहा तासांच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगणेही अत्यंत गरजचे आहे. ‘जागतिक दृष्टिदानदिना’निमित्त सोलापूर शहर-जिल्ह्याचा घेतलेला मागोवा. नेत्रदानाची मागणीही दुपटीने होत असून यासाठी नेत्रदानाची चळवळ प्रभावीपणे होण्याची गरज आहे. जिल्हाभरात तीन हजार 197 जणांची नेत्रदानाचा संकल्प सोडलेला असून, तसे अर्ज भरून दिले आहेत

शहर जिल्ह्यातून नेत्राची मागणी वर्षभरातून 300 च्या घरात जाते. मात्र त्या तुलनेत फक्‍त 150 नेत्र मिळत असल्याचे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.गणेश इंदूरकर यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले. तरीही यात प्रगती होत असून दरवर्षी यात वाढ होत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्‍त केले. नेत्रदानातील गैरसमजाबाबत प्रबोधन केल्याने मरणोत्तर नेत्रदान संकल्प फॉर्म भरणामध्ये कमालीची वाढ होत आहे. कित्येक लोक वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, अशा कित्येक दिनाचे औचित्य साधून नेत्रदान संकल्पचे फॉर्म भरून घेतात. मात्र प्रत्यक्षात मरणोत्तर नेत्रदानाची वेळ आल्यानंतर त्यांना याचा विसर पडतो. त्यामुळे नेत्रदानाच्या चळवळीला मर्यादा पडतात. नेत्रदानाचा फॉर्म भरून देवून न थांबता प्रत्यक्षात वेळ आल्यानंतर जवळच्या लोकांना त्याबाबत योग्य ती माहिती, सूचना देणे गरजेचे आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्‍तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा. पंखा चालू असताना तो बंद करावा. शक्य असल्यास अधूनमधून सूक्ष्म जंतूनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्‍तीच्या डोळ्यांमध्ये टाकावेत. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. मृत पावलेल्या व्यक्‍तीचे डोळे अंदाजे 6 इंच वर उचलून ठेवावेत. असे केल्याने डोळे काढताना रक्‍तस्त्राव टाळता येऊ शकतो. यासह अनेक बाबी आहेत. याबाबत जागरुकता  होण्याची गरज आहे. 

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सोलापूर 10 जूनपासून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा भरवला जात असल्याचे नेत्रदान समुपदेशक विकास लिंगराज यांनी सांगितले. शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल आय बँक ट्रस्ट, सोलापूर, प्रधान आय हॉस्पिटल, जोग नेत्र संकलन व नेत्ररोपण केंद्र, वाळवेकर हॉस्पिटल आणि सर्वोपचार रुग्णालयाचे फिरते नेत्रपथक यांच्यामार्फत 2017-2018 या सालात 136 नेत्र जमा झाले. त्यातील 96 नेत्रांचे व्यवस्थित नेत्ररोपण करण्यात आले. उर्वरित 40 नेत्रांत रेबीज, इतर आजार दिसून आल्याने ते संशोधन, अभ्यासवर्गासाठी पाठविण्यात आले आहेत. संपूर्ण शहर-जिल्ह्यात 3 हजार 197 जणांचे मरणोत्तर नेत्रदान संकल्पाचे फॉर्म  भरून घेतले असल्याचे सांगितले.