होमपेज › Solapur › महामार्गांतून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री

महामार्गांतून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री

Published On: May 02 2018 10:49PM | Last Updated: May 02 2018 10:16PM



सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या  58 व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण आणि संचलनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या विविध पथकांनी संचलनाद्वारे मानवंदना दिली. त्याचबरोबर पोलिस महासंचालक पदक मिळालेले पोलिस अधिकारी,  कर्मचारी, तसेच गुणवंत तलाठी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर-सांगली, सोलापूर-विजापूर, सोलापूर- तुळजापूर याचबरोबर जिल्ह्यातून जाणारे पालखी मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या विकासामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. सोलापूरचा विविध शहरांशी जलद संपर्क झाल्यामुळे व्यापार, उद्योग याचबरोबर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.

जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेतून 1022 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात नवउद्योजक घडतील, असा विश्‍वास व्यक्त करून पालकमंत्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख आठ हजार   शेतकर्‍यांना 561 कोटी रुपयांची  कर्जमाफी देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्याने यंदाही  राज्यात प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे.

जिल्हा परिषद विविध योजनांच्या माध्यमातून विकासविषयक चांगले काम करीत आहे. विशेषत: आरोग्याच्या क्षेत्रात जिल्हा परिषदेने केलेले काम उल्लेखनीय आहे. ‘स्वच्छ भारत’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेने नवा पॅटर्न विकसित केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 300 किलोमीटरवर रस्ते तयार होतील. यामुळे गावांचा शहरांशी असणारा संपर्क वाढेल, असेही पालकमंत्री देशमुख म्हणाले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर मध्यवर्ती इमारत येथे तहसीलदार अमित माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.  
पोलिस आयुक्तालयामध्ये पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त  नामदेव चव्हाण, अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले, आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक अत्तार, पोलिस अधिकारी उपस्थित होते.