Wed, May 22, 2019 14:18होमपेज › Solapur › हल्लाबोलमध्ये ‘देशमुख’टार्गेट!

हल्लाबोलमध्ये ‘देशमुख’टार्गेट!

Published On: Mar 25 2018 10:34PM | Last Updated: Mar 25 2018 10:14PM सोलापूर : महेश पांढरे  

विद्यमान भाजप-शिवसेना शासनाच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी तसेच निष्क्रिय शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या शुक्रवारी 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळीही उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील आणि लतीफ तांबोळी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या हल्लाबोलमध्ये विकासकामे आणण्यात अपयशी ठरलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख टार्गेट राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गेल्या तीन वर्षांपासून राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असून नोटबंदीपासून ते कर्जमाफीपर्यंत अनेक आघाड्यावर हे सरकार अपयशी ठरले आहे. शासनाच्या अनेक निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला हाल सोसावे लागत आहे. अनेक विकासकामे रखडली असतानाही शासन त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कष्टकर्‍यांपासून ते सुशिक्षित बेरोजगारांपर्यंतचे अनेक प्रश्‍न असताना शासनाने यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. तसेच नियोजनाचा अभाव असल्याने विद्यमान शासन अनेक आघाडीवर अपयशी ठरले आहे. या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी आणि शासनाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठीच राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी जिल्ह्यातील प्रमुख शहरात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी खा. सुप्रिया सुळे, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तालुकानिहाय बैठका घेऊन योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून सरकारची झोपच उडविण्याचा प्रयत्न या हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही दीपक साळुंके-पाटील यांनी सांगितले आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून नियोजन सुरु असून राष्ट्रवादी जनतेचा प्रक्षोभ शासनापुढे मांडणार असल्याचे साळुंखे-पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.