Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Solapur › डेंग्यूसदृश्य आजाराचा विळखा; ऑगस्टमध्ये आढळले हजार रुग्ण!

डेंग्यूसदृश्य आजाराचा विळखा; ऑगस्टमध्ये आढळले हजार रुग्ण!

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:13PMसोलापूर : विशेष प्रतिनिधी

राज्यात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाल्याचे आढळून आले असून ऑगस्टअखेर राज्यभरात तब्बल 1 हजार 151 रुग्ण रक्तचाचणीत ‘डेंग्यू पॉझिटिव्ह’ आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहर व जिल्ह्यात आढळले असून त्याखालोखाल मुंबई, नाशिक आणि पुणे शहर व जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सोलापूर शहर व जिल्ह्यात 55 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. सध्या राज्यात डेंग्यूच्या प्रसाराला अनुकूल वातावरण असल्याने या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे.

पावसाळी वातावरण व जागोजागी तुंबलेली गटारे यामुळे डेंग्यू विषाणूचा प्रसार करणार्‍या डासांना अंडी घालण्यास अनुकूल वातावरण लाभल्याने ऑगस्टमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ताज्या अहवालानुसार सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबईसह राज्यभरात डेंग्यूसदृश्य आजाराचा उद्रेक झालेला दिसतो. सोलापूर शहर व जिल्ह्यात ऑगस्टअखेर 55 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून कोल्हापूर 251, पुणे 131, पालघर 64, नांदेड 60, नाशिक 51, चंद्रपूर 40 आणि सांगली शहर व जिल्ह्यात 38 रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात या वर्षात सर्वाधिक 1 हजार 61 रुग्णांची, तर नाशिक महापालिका क्षेत्रात 334 रुग्णांना डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याची माहितीदेखील आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. 

डेंग्यूमुळे राज्यभरात ऑगस्टअखेर तब्बल नऊजणांचा बळी गेला असून त्यात कोल्हापूरमधील तिघांचा समावेश आहे. नाशिक, मुंबई, वसई-विरार येथील प्रत्येकी एकजण, तर कोल्हापूर ग्रामीणमधून दोन व जालना येथे एकाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरमध्येदेखील डेंग्यूसदृश्य आजाराने नुकताच एका तरुणाचा बळी गेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडे केवळ शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी झालेल्या रुग्णांचीच माहिती असून खासगी रुग्णालये व दवाखाने यांच्याकडे दाखल डेंग्यूग्रस्त रुग्णांची आकडेवारी उपलब्ध नसल्याने राज्यात डेंग्यूग्रस्तांची संख्या अधिक असल्याची भीतीही वर्तविली जात आहे. डेंग्यूची तपासणी करण्यासाठी खासगी व शासकीय रुग्णालयांकडे वेगवेगळी तपासणी कीट आहे. त्यामुळे रक्तचाचणीचे अहवालदेखील वेगवेगळे येत असल्याची बाबही तज्ज्ञ डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिली आहे.

सोलापुरात चिकुनगुनियाची साथ गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर शहरात चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये या रुग्णांची संख्या मोठी आहे.