Tue, Mar 26, 2019 22:25होमपेज › Solapur › महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर ‘छमछम’

महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर ‘छमछम’

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 15 2017 1:44PMसोलापूर : अमोल व्यवहारे

सोलापूर  शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली धुमधडाक्यात विनापरवाना डान्सबार सरू आहेत. याकडे या भागातील लोकप्रतिनिधी, पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात डान्सबार सुरू आहेत. पण या गोष्टीकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे सोलापूर शहरवासीयांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डान्सबारचा असाच धुमाकूळ असाच सुरू राहिला तर त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. 

सोलापूर शहर हे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वसलेले आहे. त्यामुळे मुंबईनंतर याठिकाणी सर्वात जास्त म्हणजे सुमारे 10 डान्सबार निर्माण झाले होते. परंतु राज्य सरकारने डान्सबार बंद केल्यानंतर हे सर्व डान्सबार बंद झाले होते. त्यानंतर डान्सबारचालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने  मुंबईत  काही डान्सबारला परवानगी देण्याबाबत राज्य सरकारला सांगितल्याप्रमाणे मुंबईत काही डान्सबार सुरू झाले . परंतु सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.

ऑर्केस्ट्रा बार नावालाच

दारू विक्री करणार्‍या बारमधून ग्राहकांचे मनोरंजन व्हावे त्यामुळे ऑर्केस्ट्रा बारची संकल्पना निर्माण झाली. परंतु सोलापुरातील ऑर्केस्ट्रा बारमधील परिस्थिती पाहिली असता ऑर्केस्ट्रा बारच्या संकल्पनेला केव्हाच हरताळ  फासल्याचे दिसून येते.  सोलापूर जिल्ह्यात आयुक्तालयाच्या हद्दीतील फौजदार चावडी, सदर बझार, विजापूर नाका या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत, तर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सोलापूर तालुका, मंद्रुप  पोलिस  ठाण्याच्या हद्दीत ऑर्केस्ट्रा  बार सुरू आहेत. यातील अनेक ऑर्केस्ट्रा बारमधून रात्री उशिरा डान्सबार सुरू होतो आणि तो मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो.  या ऑर्केस्ट्रा बारमधून ऑर्केस्ट्रामध्ये असल्यासारखी   गायिका आणि   वादक  कलाकार  हे नावापुरतेच  असतात. खरेतर कर्णकर्कश लाऊडस्पिकरवर चित्रपटातील गाण्यांवर अश्‍लिल हावभाव करीत थिरकणार्‍या बारबालाच  येथे  दिसून  येतात.  सोलापूर शहरामध्ये डान्सबारचा सुरू असलेला धुमाकूळ पाहता व्यवस्थेतील कोण लोक याच्या पाठीशी आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. 

परवानगीविना अव्याहत सुरू आहेत डान्सबार

या ऑर्केस्ट्रा बारसाठी पोलिस, महसूल आणि  राज्य  उत्पादन  शुल्क  या तीनही विभागांची परवानगी आवश्यक असते. तरीही काही बार हे कोणत्या तरी एका विभागाचीच परवानगी घेऊन सुरू असून यामधून बेकायदेशीररित्या दारूची विक्री केली जात आहे. तरीही याकडे लोकप्रतिनिधी, पोलिस, महसूल, उत्पादन शुल्क विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काही बार महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर, तर अनेक बार हे प्रमुख महामार्गांवर आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने डोळेझाक न करता कारवाईचा चांगलाच बडगा उगारून हे बार बंद करावेत,  किंवा त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून  होत आहे.