Sun, May 26, 2019 00:44होमपेज › Solapur › तरुणाला मारहाण करुन सोन्याची अंगठी चोरली; चौघांवर गुन्हा दाखल

तरुणाला मारहाण करुन सोन्याची अंगठी चोरली; चौघांवर गुन्हा दाखल

Published On: Apr 21 2018 10:38PM | Last Updated: Apr 21 2018 10:18PMसोलापूर : प्रतिनिधी

तरुणाला मारहाण करुन 10 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या चौघांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण दत्तू आरके (वय 27, रा. बापूजी नगर, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन किशोर पोतराज, दीपक साकालोलू, मनोज म्हेत्रे, आमाटे (रा. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास किरण आरके हा बापूजी नगरातील ब्लॉक नं. 30 समोर मित्रासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीची तयार करीत होता. त्यावेळी त्याचा भाच्चा ऋषिकेश तुळसे यास मोटारसायकलवरुन घरी जात असताना अडवून किशोर पोतराज, दीपक साकालोलू, मनोज म्हेत्रे व आमटे नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याचे समजले. त्यावेळी किरण व त्याचा मित्र सुभाष सोनवणे मिळून भांडण कोणत्या कारणावरुन झाले आहे, याची माहिती घेऊन आपण उद्या  आपल्या समाजात बसवून मिटवून घेऊ, असे समजावून सांगत असताना किशोर पोतराज व इतरांनी किरण यास लाथाबुक्क्याने मारहाण करुन उजव्या हातातील 10 हजार रुपये किंमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी गर्दीचा फायदा घेऊन जबरदस्तीने चोरुन नेली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

पोलिस कर्मचार्‍याला दमदाटी करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल
पोलिस कर्मचार्‍याला दमदाटी करुन सरकारी कामात अडथळा आणणार्‍याविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई युवराज विलास गायकवाड (ब. नं. 1855, वय 26, नेमणूक- दंगा नियंत्रण पथक, सोलापूर शहर) यांच्या फिर्यादीवरुन चंदू कुरमय्या म्हेत्रे (वय 35, रा. बापूजी नगर, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री बापूजी नगरात दगडफेकीची घटना घडली असून दंगा नियंत्रण पथक बापूजी नगरात तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या  सुमारास  किरण आरके हा दंगा नियंत्रण पथकाकडे धावत आला व त्याने ऋषिकेश तुळसे यास काही लोक मारहाण करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस शिपाई गायकवाड व इतर कर्मचार्‍यांसमवेत ज्ञानसागर प्रशालेजवळ गेले. त्यावेळी किरण आरके हा मारहाण करणार्‍या किशोर पोतदार याचे घर दाखवित असताना चंदू म्हेत्रे आला व त्याने पोलिस कर्मचार्‍यांना दमदाटी करुन तुम्ही मला ओळखत नाही का, अशी दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा आणला. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पठाण तपास करीत आहेत. 

घरजागा खाली करण्यासाठी महिलेला धमकी 
घरजागा खाली करण्यासाठी चंद्रकला मारुती जाधव (वय 40, रा. केशव नगर, दक्षिण सदर बझार, सोलापूर) या महिलेला धमकी  देऊन दमदाटी करणार्‍या जलील महिबूब मुल्ला (वय 50, रा. केशव नगर, सोलापूर) याच्याविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 एप्रिल रोजी घडली आहे. पोलिस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

बनावट लेबल लावून स्कर्ट विकणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल
मफतलाल कंपनीचे  बनावट लेबल लावून रेडिमेड कपडे विकणार्‍याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेशकुमार कामता सिंग (वय 39, रा. बिना डेनेस्टी, एव्हर साईन सिटी, वसई ईस्ट, मुंबई) याच्या फिर्यादीवरुन तेजश्री गारमेंटचे मालक रवि रच्चा (रा. सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजश्री गारमेंटचे मालक रवि रच्चा याने मफतलाल कंपनीने कोणतेही अधिकारी दिलेले नसताना त्यांच्या कंपनीचे बनावट लेबल तयार करुन ते लेबल मुलीच्या स्कर्टवर लावून त्याची विक्री केली. म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने तपास करीत आहेत.