Mon, Jun 17, 2019 19:08होमपेज › Solapur › विद्यार्थिनीचा विनयभंग; प्राचार्यावर गुन्हा

विद्यार्थिनीचा विनयभंग; प्राचार्यावर गुन्हा

Published On: Dec 01 2017 9:08AM | Last Updated: Nov 30 2017 9:52PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरुन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी   सोशल   महाविद्यालयाचे प्राचार्य  आणि  वॉचमनविरुध्द  जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्दाम नाईकवाडी व प्राचार्य डॉ. दलाल (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे.

यातील फिर्यादीची मुलगी ही सोशल महाविद्यालयामध्ये शिकण्यास असून बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ती गाडीवरुन महाविद्यालयात आली होती. त्यावेळी महाविद्यालयातील वॉचमन सद्दाम नाईकवाडी पार्किंगला गाडी लावण्याच्या कारणावरून पीडित विद्यार्थिनीचा हात झटकून तिच्याशी गैरवर्तन केले तसेच अर्वाच्च शिवीगाळ करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही बाब पीडित विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात येऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दलाल यांना सांगून वॉचमनविरूध्द तक्रार केली. प्राचार्यांनी कोणतीही चौकशी न करता उलट हे प्रकरण मिटविण्यासाठी पीडितीच्या वडिलांवर दबाव आणून वॉचमन नाईकवाडी याच्या कृत्यास खतपाणी घालण्याचे काम केले म्हणून याबाबत पीडितेच्या वडिलांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आयलाने तपास करीत आहेत.

विवाहितेचा छळ; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल
पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका इरेश क्यातम (वय 20, रा. नागेंद्रनगर, स्वागतनगर रोड, सोलापूर, हल्ली संगमनगर, एमपी गॅस पंपामागे, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती इरेश शंकर क्यातम, सासू सखूबाई शंकर क्यातम (रा. नागेंद्रनगर, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इरेश व प्रियंका यांचा विवाह मे 2014 मध्ये झाला आहे. लग्नानंतर पती इरेश व सासू सखूबाई या दोघांनी संगनमत करुन प्रियंका हिने तिच्या आई-वडिलांकडून भिशीचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी 50 हजार रुपये आणावेत व प्रॉपर्टीचा हिस्सा हुंडा म्हणून घेऊन यावा यासाठी तिला मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करुन घरातून हाकलून दिले म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार घुगे तपास करीत आहेत.

टायर फुटल्याने ट्रकला अपघात
ट्रकचे पुढचे टायर फुटल्याने गाडी खड्ड्यात जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात ट्रकमधील चारजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील चिखली गावाजवळ झाला. मीरा नागनाथ वायदंडे (वय 40, रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर), पद्मिनी पोपट वायदंडे (वय 43, रा. मलिकपेठ, ता. मोहोळ), बालाजी काशिनाथ आचारी (वय 45, रा. विश्रांतवाडी, पुणे), विठ्ठल किरन वायदंडे (वय 13, रा. देगाव)  अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.