Tue, Oct 24, 2017 16:55
29°C
  Breaking News  

होमपेज › Solapur › सख्ख्या चुलत बहिणीवर बलात्कार

सख्ख्या चुलत बहिणीवर बलात्कार

By | Publish Date: Jul 21 2017 3:34PM

सोलापूर : प्रतिनिधी

चौथीमध्ये शिकणार्‍या 9 वर्षाच्या सख्ख्या चुलत बहिणीवर बलात्कार करणार्‍या तरुणास सलगर वस्ती पोलिसांनी अटक करुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील पीडित 9 वर्षाची मुलगी ही चौथीमध्ये शिकत असून ती सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तिच्या आई-वडिलांसह राहते.

30 एप्रिल 2017 रोजी तिच्या शाळेला सुटी लागल्याने तिच्या आईने तिच्या मोठ्या दीराच्या घरी तिला सोडले होते. काही दिवस पीडित मुलगी ही तिच्या काकांकडे राहिल्यानंतर ती पुन्हा तिच्या घरी गेली. गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तसेच तिच्या वागण्यामध्ये फरक जाणवू लागला होता. त्यामुळे तिच्या आईने तिला विश्‍वासात घेऊन तिला होत असलेल्या त्रासाबाबत विचारले असता, पीडित मुलीने सांगितलेल्या घटनेनंतर तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

पीडित मुलगी ही तिच्या काकाच्यां घरी असताना तिच्या सख्ख्या चुलत भावाने घरात कोणी नसताना मोबाईलवरील घाणेरडे व्हिडिओ चित्रे दाखवून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. हे ऐकून तिच्या आईने चाईल्ड लाईनशी संपर्क साधून त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर सलगर वस्ती पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

हा गुन्हा दाखल होताच सलगर वस्ती पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस अटक केली. ही कामगिरी पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते, सहायक पोलिस आयुक्‍त नदाफ, पोलिस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल गवसाने यांनी केली. गेल्या काही दिवसांमध्ये सलगर वस्ती पोलिस ठाण्यात 5 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून सलगर वस्ती पोलिसांनी प्रत्येक गुन्हा दाखल होताच काही तासांमध्ये आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केलेली आहे.