Mon, Jul 22, 2019 02:37होमपेज › Solapur › सोलापूर : आत्महत्या प्रकरणातून ९ जणांची निर्दोष मुक्तता

सोलापूर : आत्महत्या प्रकरणातून ९ जणांची निर्दोष मुक्तता

Published On: Dec 13 2017 3:23PM | Last Updated: Dec 13 2017 2:15PM

बुकमार्क करा

मोहोळः प्रतिनिधी

मोहोळ शहरातील बहुचर्चीत बिशी चालकाच्या आत्महत्या प्रकरणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी नऊ जणांची निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायाधीश आर.एस पाटील यांनी या महत्वपुर्ण खटल्याचा मंगळवारी १२ डिसेंबर रोजी निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, मोहोळ शहरातील महेश चंद्रकांत देशमाने हे अनेक वर्षांपासून भिशी चालवित होते. सन 2015 रोजी आरोपींनी भिशीची रक्कम उचलली होती. मात्र त्या रक्कमेची परतफेड त्यांनी केली नव्हती. आरोपींकडे वारंवार पैशांची मागणी करुन देखील आरोपींनी सदरची रक्कम न दिल्यामुळे महेश देशमाने यांचा भिशीचा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यामुळे भिशीतील इतर सभासदांना ते वेळेवर पैसे न देऊ शकल्याने त्या व्यवसायातील त्यांची पत कमी झाली होती. त्यामुळे ते खुपच निराश झाले होते. अखेर त्यांनी दिनांक 09 जानेवारी 2016 रोजी नैराश्येपोटी सुसाईड नोट लिहुन माढा तालुक्यातील मोडनिंब येथील ओंकार लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

या प्रकरणी टेंभुर्णी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दिनांक 11 जानेवारी 2016 रोजी कोमल महेश देशमाने यांनी मोहोळ शहरातील नऊ जणांच्या विरोधात फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा टेंभुर्णीहून मोहोळ पोलीसात वर्ग करण्यात आला होता. मोहोळ पोलीसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र पाठवून दिले होते. तेव्हापासून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. 

मंगळवारी 12 डिसेंबर रोजी या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस पाटील यांनी विनय गजानन पाटील, संतोष हरिश्‍चंद्र अलकुंटे, वजीर महम्मद पटेल, सागर श्रीकांत गोटे, नागनाथ बबन गवळी, बक्तार सय्यद शेख, सत्तार अब्दुल इनामदार, गणेश तानाजी माळी, दत्तात्रय तानाजी मोरे सर्व रा. मोहोळ यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. 

या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने आयडीया कंपनीचे नोडल ऑफिसर, तपास अधिकारी व फिर्यादीसह एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपींच्या वकीलांनी महेश देशमाने यांच्या सुसाईड नोट मध्ये आरोपींच्या नावांचा उल्लेख असणे पुरेसे नसून देशमाने यांना झालेला त्रास आरोपींमुळेच झाल्याचे शाबीत करणे जरुरीचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर करुन आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा युक्तीवाद केला होता. त्यानुसार न्यायालयाने आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून सर्व नऊ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर.व्ही पाटील, अ‍ॅड. एम.ए इनामदार, अ‍ॅड. वसीम डोंगरी, अ‍ॅड. व्ही.डी फताटे यांनी काम पाहिले तर सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. पी.एस जन्नू यांनी बाजू मांडली.