Sat, Nov 17, 2018 06:41होमपेज › Solapur › नगरसेवक संदीप पवारांच्या खूनाचा कट सांगलीत

नगरसेवक संदीप पवारांच्या खूनाचा कट सांगलीत

Published On: Mar 23 2018 8:15PM | Last Updated: Mar 23 2018 8:15PMसांगली : प्रतिनिधी

पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचा कट सांगलीत शिजल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यातील या खुनातील मुख्य संशयित बबलूस सुरवसे याच्या सांगलीतील दोन साथीदारांना सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. यातील एकजण अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी सांगलीतील आणखी काहींना अटक होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

प्रथमेश चंद्रकांत लोंढे (वय 22, रा. पी. आर. पाटील मार्ग, सांगली), ओंकार नंदकुमार जाधव (वय 22, रा. हिराबाग कॉर्नर, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पवार यांच्या खूनप्रकरणी ठाणे पोलिसांनी बबलू सुरवसे, पुंडलिक वनारे, मनोज शिर्सेकर, भक्तराज धुमाळ यांना अटक केली होती. त्यानंतर पंढरपूर पोलिसांनी आकाश बुराडे, लल्ल्या ऊर्फ रूपेश सुरवसे, सचिन वाघमारे यांना अटक केली होती. 

दरम्यान सोलापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवार दि. 19 रोजी सांगलीत छापे टाकून बबलूच्या नातेवाईकांकडे चौकशी केली होती. तसेच त्याच्या मित्रांबाबतही चौकशी केली होती. त्यानंतर गुरुवारी ओंकार जाधवला अटक करण्यात आली. तर शुक्रवारी प्रथमेश लोंढेला अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित बबलूचा मामा कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगरमध्ये राहतो. सोलापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्याकडे तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली. पंढरपूरच्या या खुनाचे कनेक्शन सांगलीपर्यंत पोहोचले आहे. 

दरम्यान बबलू सांगलीत वास्तव्यास असताना त्याची येथील स्थानिक युवकांशी मैत्री झाली होती. पंढरपूरचे नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचा कट बबलूसह सर्व साथीदारांनी सांगलीतच रचल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटात प्रथमेश लोंढे आणि ओंकार जाधव सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सांगलीत कट रचल्यानंतर सर्व संशयित खुनाच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे गेले होते अशी कबुली लोंढे आणि जाधव यांनी दिली आहे. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे निरीक्षक कुंभार यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात सांगलीतील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

ओंकार जाधव अभियांत्रिकीचा विद्यार्थी

या खुनातील संशयित ओंकार जाधव हा पलूस येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविकेच्या तिसर्‍या वर्षात शिकत आहे. बबलू सांगलीत वास्तव्यास असताना त्यांची ओळख झाली होती. पवार यांच्या खुनाचा कट रचताना ओंकारही सहभागी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. 

बबलूकडून सांगलीत गोळीबाराचा बनाव...

बबलू मूळचा पंढरपूर येथील आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून तो कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथे मामाच्या घरी रहात होता. दि. 4  फेब्रवारी 2017 रोजी सांगली-कर्नाळ रस्त्यावरील गोवर्धन चौकात त्याच्यवर भर दिवसा गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. हा गोळीबार पंढरपूर येथील नगरसेवक संदीप याच्यासह त्याच्या साथीदारांनी केल्याची फिर्यादही त्याने सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासात बबलूने गोळीबाराचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले होते.