Fri, Apr 26, 2019 17:20



होमपेज › Solapur › सोलापूर : महापालिकेच्या लाखमोलाच्या गाळ्यांना कवडीमोल भाडे 

सोलापूर : महापालिकेच्या लाखमोलाच्या गाळ्यांना कवडीमोल भाडे 

Published On: Jul 07 2018 9:43AM | Last Updated: Jul 07 2018 9:43AM



सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर शहरातील हार्ट ऑफ सिटी समजल्या जाणाऱ्या पार्क मैदानाच्या स्टेडिअममधील अर्थात इंदिरा गांधी स्टेडिअममधील गाळ्यांचे बाजारभावप्रमाणे भाडे सुमारे ५० ते ६० रुपये स्क्वेअर फुट पेक्षाही अधिक असताना महापालिकेच्या गाळेधारकांना मात्र केवळ ७.८९ रुपये इतकेच गाळे भाडे भरावे लागत आहे. त्यामुळे ४४५.३१ चौरस फुटांच्या या भल्या मोठ्या गाळ्यांसाठी फक्त आणि फक्त ३५१७ रुपये आकारले जात आहे. इतक्या मोठ्या बाजारपेठेतील या लाखमोलाच्या गाळे कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना दिल्याचे महापालिकेच्याच नोंदीनुसार स्पष्ट झाले आहे.

सोलापूर शहरच्या मध्यवर्ती भागामध्ये इंदिरा गांधी स्टेडीअम आहे. या स्टेडीअमच्या बाहेरील बाजूस तब्बल ५९ दुकानगाळे आहेत. त्यामध्ये १३ गाळे हे सर्वाधिक ४४५.३१ फुटाचे आहेत त्यांना केवळ दरमहा ३५१७ रुपये इतके भाडे आकारले जात आहे. कहर म्हणजे २०१२ पूर्वी त्यांना केवळ ५४६ रुपये इतकेच भाडे आकारले जात होते.  येथील सर्वात छोटा गाळा ८५ चौ. फुटाचा असून त्याला दरमहा ८०८ रुपये भाडे आकारले जात आहे. 

याच ठिकाणी खासगी गाळेधारक मात्र मात्र तब्बल २० हजार रुपयांप्रमाणे गाळे भाड्याने देत आहेत. तिथे महापालिका मात्र केवळ ३२१५ रुपये भाडे आकारत आहे. त्यामुळे महापालिकेचा या गाळ्यातून दरमहिन्याला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महापालिकेच्या इतर ठिकाणच्या गाळ्यांची मुदत संपल्याने तेथे ई-टेंडर पध्दतीने गाळे भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्यावर ३०-३० वर्ष कवडीमोल भाडे भरुणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यानी आंदोलन सुरु केले आहे. मात्र त्याला कोणतीही भीख न घालता आयुक्तानी टेंडरची प्रक्रिया सुरु केल्याने व्यापाऱ्यानी आता सोलापूर बंदची हाक दिली आहे. त्याला विरोधी पक्षानेही साथ दिली असल्यान हा वाद चिघळला आहे.