होमपेज › Solapur › थेट अभियान संचालकांकडे तक्रारींचा पाढा

थेट अभियान संचालकांकडे तक्रारींचा पाढा

Published On: Dec 08 2017 1:44AM | Last Updated: Dec 07 2017 8:05PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जबाबदारी असलेले व इतर काम  करूनही वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आर्थिक व मानसिक छळ होत आहे. त्याबद्दल महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील सर्वच अधिकारी-कर्मचार्‍यांनी अभियान संचालकांकडे तक्रारींचा पाढा लेखी  पाठवला आहे.
  
महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानात एकूण 38 अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यातील 36 जणांनी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी नाहक त्रास देत असल्याचे लेखी पत्रात म्हटले आहे. ज्यामध्ये यातील सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांची पुनर्नियुक्ती शहर कार्यक्रम व्यवस्थापनकडून करण्यात यावी. कारण पुनर्नियुक्तीसाठी येथील आरसीएच ऑफिसर पैसे घेतात. 

नेमलेल्या कामापेक्षा जास्त काम लावतात. यामध्ये इतर कामांचा अनुभव नसल्याने थोड्या फार चुका होतात. त्यावेळेस अपमानास्पद वागणूक दिली जाते. नोकरी सोडण्यास सांगितली जाते. अडचणीच्या वेळी रजा मागितल्यास दिल्या जात नाहीत. लॅबचे साहित्य मिळत नाही. आरसीएच ऑफिसर इतर काम सांगतात. ते नाही केल्यास कामावरून काढण्याची धमकी देतात. आरसीएच ऑफिसर आणि एमओ पुनर्नियुक्ती देताना अगोदर ‘एक्सलंट’ व नंतर ‘गुड’ असा  शेरा देतात. त्यामुळे वेतनवाढीस अडचणी येतात. सतत अपमानास्पद वागणूक देतात. आरसीएच ऑफिसर डॉ. शिरशेट्टी यांच्याकडून खूप त्रास होत आहे. त्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचार्‍यांना कमी लेखतात. काहीपण बोलतात. अशा व इतर तक्रारींचा पाढा महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी अभियान संचालक यांच्याकडे लेखी पाठवला आहे. ज्यामध्ये फार्मासिस्ट, एएनएम, जीएनएम, लॅब टेक्नीशियन आदी सर्वांचा समावेश आहे.