Sun, May 26, 2019 19:02होमपेज › Solapur › सोलापूर महापालिकेचे ५२ कोटी गेले कुठे ?

सोलापूर महापालिकेचे ५२ कोटी गेले कुठे ?

Published On: Jun 25 2018 9:27PM | Last Updated: Jun 25 2018 9:27PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार घेतल्यापासून आतापर्यत विविध कामांच्या बिलापोटी कंत्राटदारांना ५२ कोटी रुपये अदा केल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बजेटमध्ये  दिली आहे, मात्र ती रक्कम आमच्या कोणत्याच कंत्राटदारांपर्यंत पोचली नाही असा गौप्यस्फोट आज सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत भोसले यांनी आज महापौरांसमवेत झालेल्या बैठकीत केला.

महापालिकेतील कॉन्ट्रक्टरचे तब्बल दोनशे कोटींची बिले महापालिकेकडे थकीत असून ती तातडीने द्यावीत अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली होती. त्यासाठी त्यांनी अनेक कामेही बंद केली आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर आज महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. यावेळी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक विनायक विटकर, विरोधी पक्ष नेते महेश कोठे उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षापासून एकाही कंत्राटदारांचे बिल महापालिकेने दिले नसून त्या बिलाची एकत्र रक्कम तब्बल दोनशे कोटी इतकी असल्याचे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष भोसले यांनी सांगितले मात्र आयुक्तांनी बजेटमध्येच कंत्राटदारांची 52 कोटी रुपयांची बिले दिल्याचे दाखविले आहे. त्यामुळे हे ५२ कोटी कुठे गेले याचा तपास करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

जरी ५२ कोटी कुण्या कंत्राटदारांना महापालिकेने दिले असले तरी उर्वरीत सुमारे १४८ कोटी रुपयांची बिले दिल्याशिवाय काम सुरु करणार नाही असा इशाराही असोसिएशनने या बैठकीतच दिला.
यावेळी कंत्राटदार संघटनेचे सुनिल घाडगे, मारुती पवार, देविदास धोत्रे, विनायक निंबळगी आदींसह पन्नासहून अधिक कंत्राटदार उपस्थित होते.

आठ दिवसात हिशेब द्या : महापौरांचा आदेश  

५२ कोटी रुपये आयुक्तांनी दिल्याचे बजेटमध्ये मांडले आहे ते नेमके कुणाला दिले याचा हिशेब लेखाधिकार्‍यांनी द्यावा असे आदेश महापौरांनी आज दिले. त्याचवेळी कॉन्ट्रक्टरनीसुध्दा कुणाचे किती बील अदा केले व किती बील राहिले याचा अहवाल सादर करावा अशा सूचना कंत्राटदारांनाही दिल्या. त्या दोन्ही कागदपत्रांची तपासणी करून हा ५२ कोटींचा घोळ सोडविता येइल उर्वरीत देणीबाबत हा घोळ मिटल्यावर तातडीने तोडगा काढू असे आश्‍वासन महापौरांनी दिले.