सोलापूर : मोहोळमध्ये कोरोनाचे ३ संशयित रुग्ण आढळले?

Last Updated: Mar 30 2020 8:37AM
Responsive image
तपासणी सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात रवानगी


मोहोळ तालुका (सोलापूर) : प्रतिनिधी

मुंबईहून मोहोळ तालुक्यात आलेल्या एका गावातील तीन जणांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाने त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. मात्र, पाच तास रुग्णवाहिका न आल्याने या रुग्णांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालयातच बसून राहावे लागले. कोरोनाशी लढा देण्यासाठी तालुका प्रशासन किती निष्काळजी आहे हे स्पष्ट झाले आहे.

वाचा - इस्लामपूर येथे लहान मुलास कोरोना

कोरोनावर मात करण्यासाठी राज्य प्रशासन विविध उपाय योजना राबवून जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यातील एका गावातील तीन नागरिक मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत.

कोरोनाच्या भीतीने ते २९ मार्च रोजी आपल्या गावी आले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना अगोदर स्वतःची तपासणी करून घेण्यास सांगितले. त्यानुसार, रविवारी सकाळी अकरा वाजता ते तपासणीसाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात आले होते. यावेळी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. पी. पी. गायकवाड, डॉ. बालाजी गवाड यांनी त्यांच्या तपासण्या केल्या. यावेळी डॉक्टरांना  शंका निर्माण झाल्याने त्यांनी याबाबतची माहिती मोहोळ पोलिस प्रशासनाला कळविली.

यावेळी पोलिस नाईक अभिजित गाटे महेश कटकधौंड, निलेश देशमुख यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेत संबंधित संशयित रुग्णांना त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना केल्या. यावेळी सदर संशयित रुग्णांनी ही त्यांच्या समुपदेशनाला प्रतिसाद देत त्या ठिकाणी थांबून राहिले. मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने हे रुग्ण वैतागून गावाकडे निघून चालले होते. यावेळी  पोलिस नाईक अभिजीत गाटे यांना ते पुन्हा  मुख्य रस्त्यावर दुचाकीवर दिसल्याने त्यांनी त्या रुग्णांना विनंती करून मोहोळ ग्रामीण रुग्णालयात परत आणून बसवले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाच्या यंत्रणेने रुग्णवाहिका मिळत नसल्या बाबत तहसीलदार यांना माहिती दिली. परंतु यासंदर्भातील रुग्णांना रुग्णवाहिका लवकर उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने एवढी दक्षता घेऊनही ही मोहोळ तालुक्यात अशा पद्धतीने  पाच तासांच्या कालावधी नंतरही रुग्णांना रूग्णवाहिका मिळाली नाही. यामुळे मोहोळ तालुक्याच्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसत आहे. याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

ग्रामीण रुग्णालयाला स्वतंत्र रुग्णवाहिकेची गरज

तालुक्यातील एकमेव असलेल्या मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला स्वतःची रुग्णवाहिका नाही. १०८ क्रमांकांवर वारंवार विनंती करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. आजच्या प्रकरणातदेखील रुग्णवाहिका तब्बल पाच तास उशीरा आली. त्यामुळे संशयित असलेल्या त्या तीन रुग्णांमुळे अन्य नागरिकांनाही बाधा होण्याचा धोका होता. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाच्या धर्तीवर मोहोळ ग्रामीण रुग्णालयासाठी तात्काळ स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय करणे गरजेचे आहे.

वाचा - दवाखान्यांत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?articleId: "185573", img: "Article image URL", tags: "solapur, corona, suspected, patient , mohol , मोहोळ , सोलापूर, कोरोना",