Mon, Apr 22, 2019 22:07होमपेज › Solapur › काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 21 2018 11:54PMलोकशासन : प्रशांत माने

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सध्या वरुणराजा सढळ हस्ते बरसत असल्याने अनेक धरणे तुडुंब भरली असल्याने पुढील धोका टाळण्यासाठी अनेक धरणांचे दरवाजे उघडलेले असतानाच आता आगामी निवडणुकांमधील संभाव्य धोका ओळखून पक्षातून बाहेर गेलेल्यांसाठी सोलापुरातही काँग्रेसने पक्ष प्रवेशाचे दरवाजे उघडल्यामुळे अनेकांचा ‘घरवापसी’चा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेत गेलेल्या दोन माजी महापौरांच्या घरवापसीची चर्चा सध्या जोरात सुरू असल्याने भाजप व सेनेमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका दूर असल्या तरी सोलापुरात लोकसभेसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरातील वाढते दौरे याचे उदाहरण आहे.

गतवेळच्या निवडणुकीत अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकत इतर पक्षांशी घरोबा केला होता. काँग्रेसला महापालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. केंद्र व राज्यासह महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे गेल्या चार वर्षांच्या काळात बॅकफूटला गेलेली काँग्रेस पुन्हा उभारी धरण्याच्या प्रयत्नात आहे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ म्हणत काँग्रेसचे नेते शिंदे यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना साद घालत काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे असल्याचे सांगत अनेकांचा घरवापसीचा मार्ग मोकळा केला आहे.  काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपच्या वळचणीला गेलेले काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख आणि काँग्रेस सोडून शिवसेनेचा भगवा हातात घेतलेले काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे हे घरवापसी करणार का, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कारण या दोघांच्या घरवापसीने काँग्रेसमधील अनेक समिकरणे बदलणार आहेत. काँग्रेसला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घरवापसीचा लाभ होण्याची शक्यतादेखील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

काँग्रेसने घरवापसीचा दिलेला नारा हा निवडणुका जवळ आल्याचेच संकेत देणारा आहे. निवडणुका दूर आहेत असे म्हटले तरी एकूणच राजकीय घडामोडी पाहता राजकीय वातावरण ढवळू लागल्याचे चित्र आहे. नुकत्याच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गट-तट व पक्षांतर्गत वाद, मतभेद, मनभेद विसरून एकत्र आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सहकारमंत्र्यांच्या गटाला धोबीपछाड दिली होती. एकत्र आल्यास काँग्रेसची ताकद मोठी असल्याचे जाणून असलेल्या काँग्रेसने दिलेल्या घरवापसीला पक्षातून बाहेर गेलेले आणि इतर पक्षांचे कोण किती प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.