Sun, Apr 21, 2019 06:06होमपेज › Solapur › शिवशाही बसेसचा लग्नाच्या वर्‍हाडीसाठी आरामदायी प्रवास

शिवशाही बसेसचा लग्नाच्या वर्‍हाडीसाठी आरामदायी प्रवास

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 9:00PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

खासगी बसेसच्या स्पर्धेत कंबर कसत आता शिवशाही बसेस लग्नाच्या वर्‍हाडीसाठी धावणार आहेत.वातानुकूलित बसेसना असणारी मागणी लक्षात घेऊन लग्नसमारंभापासून ते विविध कार्यक्रमांसाठी शिवशाही बसेस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय एस. टी. प्रशासनाने घेतला आहे.

एस.टी. महामंडळाच्या लाल रंगाच्या बसेस यापूर्वी आपण सर्वांनी सहली, शाळा, कॉलेजचे विविध दौरे, साखरपुडे, लग्नसमारंभ व विविध कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर धावताना पाहिल्या आहेत. परंतु काही नागरिक वातानुकूलित व आरामदायी बसेसची मागणी करत खासगी बसेसला पसंती देत  बुकिंग करत होते. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या लाल डब्यांच्या मागणीमध्ये घट झाली होती. घरगुती कार्यक्रमांसाठी एस.टी.च्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्याऐवजी आरामदायी व वातानुकूलित बसेसचा पर्याय स्वीकारण्यात येत होता. शिवशाही बसेसचे ब्रँडिंग करत आरामदायी व वातानुकूलित शिवशाही बसेस लग्नसमारंभ, साखरपुडे, बारसे अशा विविध कार्यक्रमांसाठी कमी दरात उपलब्ध केल्या असल्याची माहिती देण्यात आली. 45 आसनी शिवशाही बस फक्त 54 रुपये प्रति कि.मी. या दराने भाडेतत्त्वावर मिळणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व एस.टी. आगारांना देण्यात  आले आहे. प्रति दिवस 350 रुपये कि.मी. एवढे बसभाडे गृहीत धरले जाणार आहे. संपूर्ण राज्यभरात शिवशाहीच्या 150 बसेस धावत आहेत. त्यापैकी काही बसेस प्रासंगिक करारानुसार उपलब्ध केल्याची माहिती देण्यात आली आहेे.