Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Solapur › रोजंदारी कर्मचार्‍यांचे वेतन थकले

रोजंदारी कर्मचार्‍यांचे वेतन थकले

Published On: Feb 13 2018 1:59AM | Last Updated: Feb 12 2018 9:09PMसोलापूर : प्रतिनिधी

सिव्हिल हॉस्पिटलमधील रोजंदारी कर्मचार्‍यांच्या वेतनाचा तिढा गेल्या चार वर्षांपासून जसाच्या तसा आहे. त्यांचे वेतन तीन-तीन महिने होत नाही. त्यामुळे यातील कर्मचारी  हैराण झाले असून काम सोडण्याच्या मार्गावर आहेत. सिव्हिल प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

 श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कामे करण्यासाठी दीडशेपर्यंत रोजंदारी कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून सिव्हिल व मेडिकल कॉलेची स्वच्छता, येथील परिसराची साफसफाई, रूग्णांना ने-आण करणे, स्वच्छतागृहाची स्वच्छता करणे, डॉक्टरांना मदत करणे आदी सर्व कामे करवून घेतली जात आहेत.  साफसफाईपासून ते अतिदक्षता विभागापर्यंत सर्व कामांसाठी त्यांची नेमणूक केली जाते. मात्र पगार वेळेवर केला जात नाही. प्रत्येक वेळेस तीन महिन्यानंतर एका किंवा दुसर्‍या महिन्याचा पगार दिला जातो. पुन्हा पुढचे तीन ते चार महिन्यांनंतर ‘ये रे माझ्या मागल्या...’ अशी परिस्थिती गेल्या चार वर्षांपासून  सुरू आहे.

यावर सिव्हिल प्रशासन व्याज खात आहे का? असा प्रश्‍न येथील रोजंदारी कर्मचार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.  वेतनाची समस्या सोडवण्यासाठी येथील रोजंदारी कर्मचार्‍यांनी दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन दिले आहे. मात्र तरीही हा प्रश्‍न मार्गी लागला नाही. त्यामुळे वेळोवेळी निवेदने देऊन, योग्य त्या मार्गाने प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करूनही वेतनाचा प्रश्‍न सोडवला जात नाही. त्यामुळे रोजंदारी कर्मचारी सामूहिक कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे येथील कर्मचार्‍यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.