Sun, Mar 24, 2019 12:59होमपेज › Solapur › शहर पोलिस पेट्रोल पंपाची ५ लाखांची रोकड लुटली

शहर पोलिस पेट्रोल पंपाची ५ लाखांची रोकड लुटली

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 10:20PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस दलाच्या अशोक चौकातील पेट्रोल पंपावर जमा झालेली 5 लाखांची  रोकड  पोलिस मुख्यालयात देण्यासाठी जाणार्‍या सहायक फौजदाराच्या डोळ्यात चटणी टाकून,  चाकूने   वार  करून   सहाजणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने लुटून नेली. ही घटना रविवारी रात्री 11 च्या सुमारास पोलिस मुख्यालयासमोरील मार्कंडेय जलतरण तलावाजवळ घडली. यावेळी जखमी सहायक फौजदाराने दरोडेेखोरांशी झटापट केली; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. 

याबाबत पेट्रोल पंपावरील इन्चार्ज  सहायक फौजदार मारुती राजमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिसात सहा दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजमाने हे सोलापूर शहर पोलिसांच्या अशोक चौक पोलिस चौकीच्या मागे असलेल्या पेट्रोल पंपावर इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री जमा झालेली  5 लाख रुपयांची रोकड घेऊन एमएच 13 एम 8604 या दुचाकीवरून पोलिस मुख्यालयात रोकड जमा करण्यासाठी जात होते. 

मार्कंडेय जलतरण तलावाच्या गेटसमोर राजमाने यांची दुचाकी आली असता दोन दरोडेखोर चालत आले.  त्यांनी राजमाने यांच्या दुचाकीचा हँडल पकडून त्यांना  थांबविले व त्यांच्याजवळ असलेली रोकडची बॅग हिसकावून घेऊ लागले. त्यावेळी लाल रंगाच्या पल्सरवरून आणखी दोघे दरोडेखोर आले. त्यातील मागे बसलेल्या दरोडेखोरने चाकूने राजमाने यांच्यावर वार केला. तो वार राजमाने  यांच्या  डाव्या हातावर लागला. तरीही राजमाने यांनी बॅग सोडली नाही व दुचाकी घेऊन मुख्यालयाच्या दिशेने जाऊ लागले. त्यावेळी दरोडेखोरांनी राजमाने यांना मुख्यालयाच्या दिशेने जाऊ  दिले नाही. 

दुसर्‍या दुचाकीवरून आलेल्या अन्य दरोडेखोरांनी राजामाने यांना परत अशोक चौकीकडेही जाऊ दिले नाही. त्यामुळे राजमाने यांनी दुचाकी शांती चौकाकडे वळवून जोडभावी पेठ पोलिस ठाण्याकडे जाऊ लागले. कवितानगर पोलिस वसाहतीच्या अलीकडे मागून तिघे दरोडेखोर आले व त्यांनी राजमाने यांच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. मागून दुसर्‍या दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी राजमाने यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावरून घेेतली व पळून गेले. या बॅगेत 5 लाखांची रोकड, राजमाने यांचे चेकबुक, पंपावरील मुलांच्या हिशोबाची वही होती. त्यानंतर राजमाने यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली.याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले यांच्यासह आयुक्तालयामधील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी  घटनास्थळी  धाव घेतली व पाहणी केली. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक माढेकर तपास करीत आहेत. 

Tags : solapur, city police, petrol pump,5 lakh, theft,