Wed, Apr 24, 2019 08:05होमपेज › Solapur › अवकाळी पावसाने सोलापूरला झोडपले

अवकाळी पावसाने सोलापूरला झोडपले

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 10:14PMसोलापूर : प्रतिनिधी

सकाळपासून उकाड्याने हैराण झाल्याने सोलापूरकर बैचेन झाले होते. सायंकाळी अचानक वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस आला. यात अनेक झाडांची पडझड, तर जय मल्हार चौकासह अनेक नगरांतील घरात पाणी घुसले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे भवानीपेठेत घराचा सज्जा कोसळून त्याखाली चिरडून एका बालिकेचा मृत्यू झाला.

रामलाल चौक, मुकुंदनगर, होटगी रोड,  पोलीस मुख्यालय, जुना एम्प्लॉयमेंट चौक अशा अनेक भागात झाडांची पडझड झाली. देशमुख-पाटील वस्तील काही घरांवरील पत्रे उडून गेले. जय मल्हार चौक, मुकुंद नगरमधील घरात पावसाचे पाणी घुसले. घरातील छोट्यांसह मोठे घरातील पाणी उपसून बाहेर काढीत असताना त्यांची तारांबळ उडाली होती.

वादळी वार्‍यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवघ्या दोन इंच पावसाची नोंद सोलापूर हवामान खात्याकडे झाली. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला तसेच पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या नुकसानीसंदर्भात फोन येत होते. रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक सुरळीत करण्याचे काम चालू होते. मोदी  स्मशानभूमी येथील रेल्वेपूलाखाली पाणी साचल्याने लिमणेवाडीचा संपर्क तुटला. होटगी सडे, रामलाल चौक, शिवाजी चौक अशा प्रमुख चौकाच्या सखल भागात पाणी साचल्याने मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ होत होती. वादळी वार्‍यासह झालेल्या या पावसामुळे भवानीपेठेतील एका घराचा सज्जा कोसळून त्याच्या ढिगार्‍याखाली सापडून एका बालिकेचा दुर्दैवी अंत झाला. दिव्या दयानंद गजेली (वय 9, रा. भवानीपेठ) असे या बालिकेचे नाव आहे. शाळकरी मुलीचे अशा तर्‍हेने निधन झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

पावसाची रिपरीप उशिरापर्यंत सुरू होती. वादळी पावसामुळे वृक्ष कोसळल्याने शहरातील विद्युत पुरवठा बराच काळ खंडीत झाला होता. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य होते. वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करीत होते. पोलिस, अग्निशमन दल यांना वारंवार नुकसानीसंदर्भात फोन येत होते. त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली होती.