Mon, Jul 22, 2019 03:14होमपेज › Solapur › नाताळ सर्वांचा सण सहभागी होण्याचे आवाहन

नाताळ सर्वांचा सण सहभागी होण्याचे आवाहन

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 24 2017 9:02PM

बुकमार्क करा

सोलापूर : इरफान शेख

सोलापुरात अनेक वर्षांपासून सर्वधर्मीयांना घेऊन ख्रिसमस सण साजरा केला जात असल्याची माहिती द फर्स्ट चर्चचे रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितली. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ख्रिस्तबांधवांसोबत इतर धर्मांतील नागरिकांनीदेखील या आनंदोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ग्रिगेडियर कॅलेंडरनुसार 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस किंवा नाताळ सण साजरा केला जातो. या सणादिवशी ख्रिश्‍चनबांधव आपापल्या मातृभाषेत एकमेकांना शुभेच्छा देतात. उदा. मराठीमध्ये नाताळ सणाच्या शुभेच्छा.गुजरातीमध्ये आनंदी नाताळ किंवा खुशी नाताळ. कन्नडमध्ये क्रिसमस हब्बाडा, पंजाबीमध्ये करीसामा ते नवाम, उर्दूमध्ये क्रिसमस मुबारक अशा वेगवेगळ्या मातृभाषेत भारतीय ख्रिस्तबांधव एकमेकांना शुभेच्छा संपूर्ण भारतात देतात. ज्याप्रमाणे भारतात वेगवेगळ्या भाषेत नाताळच्या शुभेच्छा दिल्या जातात त्याचप्रमाणे जगातील वेगवेगळ्या देशांतील ख्रिस्तबांधव नागरिक त्यांच्या मातृभाषेत शुभेच्छा देतात.

सध्या चर्चेत असणारे शहर म्हणजे यरुशलेम हे होय. या शहरातील बेथलहम येथे भगवान येशू ख्रिस्त यांचा इसवीसनाच्या 2 र्‍या शतकात मारिया यांच्यापोटी जन्म झाला होता असे मानण्यात येते. येशू ख्रिस्त जन्मदिना दिवशी ख्रिसमस सण जगभरात साजरा केला जातो.

नाताळ सणाची ओळख ख्रिस्त तारा 

नाताळ सणादिवशी प्रत्येक ख्रिस्तबांधवांच्या घरावर आकाश दिव्याप्रमाणे ख्रिस्त तारा लावला जातो.त्याचा इतिहास पाहिला असता 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताच्या जन्मावेळी आकाशामध्ये एक शुभ्र तारा  दिसून आला होता. त्या तार्‍याचा शोध करत पूर्वेकडून 3 ज्ञानी पुरुष (मागी पुरुष) आले. त्यांनी येरुशलेम येथील बेथलहम शहरापर्यंत प्रवास केला.त्याचवेळी भगवान येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता. त्या ज्ञानी पुरुषांनी बाळाचे दर्शन घेत त्यांनी त्या शुभ्र तार्‍याला नमन केले म्हणून ख्रिस्तबांधव नाताळ सणादिवशी आपल्या घरावर चमकता तारा लावतात.

द फर्स्ट चर्चला  154 वर्षे पूर्ण होतील

सोलापूर शहराच्या मधोमध असलेले रंगभवन येथील द फर्स्ट चर्चला 9 जानेवारी 2018 रोजी 154 वर्षे पूर्ण होत आहेत, असे रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी सांगितले. 9 जानेवारी 2018 रोजी उपासना करण्यासाठी  महाधर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये हजारो ख्रिस्तबांधव उपस्थित राहणार आहेत.

भेटवस्तू देणारे सांताक्लॉज किंवा आनंदीबुवा ख्रिसमस किंवा नाताळ सणाच्या दिवशी भेटवस्तू देणारे म्हणून संत सांताक्लॉज यांना ओळखले जाते. मराठीमध्ये त्यांना आनंदीबुवादेखील म्हटले जाते. इसवीसन 3 र्‍या शतकात सेंट निकोलस नावाचे संत पाश्‍चिमात्य देशात होऊन गेले  आहेत. लहान मुलांवर प्रेम करणारे व दानधर्म करणारे संत म्हणून त्यांची ओळख होती.दरवर्षी ख्रिसमस किंवा नताळ सणाला  सांताक्लॉज एका झाडाला भेटवस्तू बांधून जात असे. प्रत्येक नाताळ सणाला सांताक्लॉजच्या वेशभूषेत ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा देतात.

द फर्स्ट चर्चमधील नाताळ कार्यक्रम

24 तारखेच्या मध्यरात्री  12 वाजता ख्रिस्त तारा प्रज्वलित केला जातोे, तर 25 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता उपासना  करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील धर्मप्रांत रेव्हरंड शरद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपासना केली जाणार आहे. 

शहरातील ख्रिस्तबांधव धर्मप्रांतांना  घेऊन रंगभवन ते सात रस्ता या मार्गावर मिरवणूक काढणार आहेत.सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सर्व जातीधर्मांसाठीच्या नागरिकांना सोबत घेऊन ख्रिस्त जन्माचा संदेश देण्यात येणार आहे. आलेल्या सर्व नागरिकांना केक वाटप करण्यात येणार आहे.