Sat, Jul 20, 2019 09:13होमपेज › Solapur › शिवरायांबद्दल अपशब्द वापरणार्‍या उपमहापौराविरुद्ध गुन्हा दाखल

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणार्‍या उपमहापौराविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 8:58PMसोलापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द  वापरल्याप्रकरणी अहमदनगरचे भाजपचे उपमहापौर  श्रीपाद   छिंदम   याच्याविरुद्ध  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. 
शुक्रवारी सकाळी छिंदम यांनी बांधकाम विभागातील एका कर्मचार्‍याला कामासंबंधी फोन केला होता. फोनवर बोलताना त्या कर्मचार्‍याने शिवजयंती होऊ द्या, मग तुमचे काम मार्गी लावू असे त्यांना सांगितले. याचा मनात राग येऊन छिंदम यांनी छत्रपती शिवराय आणि शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरले.  छिंदम व त्या कर्मचार्‍याच्या  संभाषणाची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली. 

सकल मराठा समाजाच्यावतीने माऊली  पवार, पुरुषोत्तम बरडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठून याबाबत  छिंदम  याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्यावेळी पोलिस निरीक्षक संजय जगताप   यांनी   गुन्हा दाखल  करण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. पोलिस अधिकार्‍यांची चर्चा होईपर्यंत  सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन   केल्यानंतर  पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करीत असल्याचे जाहीर करताच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर माऊली उर्फ अनंत राजाराम पवार (वय 42, रा. दमाणीनगर, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात छिंदमविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.