Sat, Nov 17, 2018 21:25होमपेज › Solapur › बनावट जात प्रमाणपत्र सादर करून वैद्यकीय शिक्षण; विद्यार्थिनीवर गुन्हा 

बनावट जात प्रमाणपत्र सादर करून वैद्यकीय शिक्षण; विद्यार्थिनीवर गुन्हा 

Published On: May 09 2018 10:21PM | Last Updated: May 09 2018 10:16PMसोलापूर : प्रतिनिधी

वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. तब्बल पाच वर्षांनंतर बनावट जात प्रमाणपत्र असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय महाविद्यालयाकडून सदर बझार पोलिस ठाण्यात विद्यार्थिनी रजा फकरुद्दीन फरीद हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 2008-2009 मध्ये रजा फकरुद्दीन फरीद (रा. दौलत कॉम्प्लेक्स, पी. बी. मार्ग, मुंबई) या विद्यार्थिनीने एमबीबीएसच्या प्रवेशा वेळी मुस्लीम तडवी या जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु, हे प्रमाणपत्र वैध नव्हते. महाविद्यालय प्रशासनास ही बाब त्यावेळी लक्षात आली नसल्याने तिला आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळाला.

महाविद्यालय प्रशासनाने मागासवर्गीय  जातीची  सर्व  कागदपत्रे पडताळणीसाठी नाशिक येथील सहआयुक्त अनुसूचित जमाती समितीकडे पाठविली. हा पडताळणी रिपोर्ट 31 जानेवारी 2018 रोजी वैशंपायन महाविद्यालयास प्राप्त झाली. जात पडताळणीमध्ये जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे निर्गमित करण्यात आले आहे. परंतु, तेवढ्या वेळेत विद्यार्थिनीचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले. प्रवेशा वेळी विद्यार्थिनी रजा फरीद हिने दिलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले असल्याने वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी समाधान उत्तम जामकर (वय 50, रा. सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात विद्यार्थिनीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास हे.कॉ.शेख करत आहेत.