Thu, Aug 22, 2019 04:40होमपेज › Solapur › वीज वितरणच्या २ अभियंत्यांसह तिघे लाचलुचपतच्या जाळ्यात

वीज वितरणच्या २ अभियंत्यांसह तिघे लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 10:00PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर शहर आणि ग्रामीण विभागातील वीज वितरण कंपनीचे दोन अभियंते मंगळवारी दोन वेगवेगळ्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सहायक अभियंता जयप्रकाश कदम आणि उपकार्यकारी अभियंता संतोष सोनवणे अशी लाचखोर अभियंत्यांची नावे आहेत, तर वीज उपकेंद्रातील ऑपरेटर चंद्रशेखर जाधव यालाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने शहरातील पानटपरीतील वीज कनेक्शन स्थलांतरित करून देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण शाखा पंढरपूर येथील सहायक अभियता जयप्रकाश कदम यास सकाळी सव्वाअकरा वाजता नवी पेठ येथे पकडण्यात आले, तर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास करकंब शाखा कार्यालयातील  उपकार्यकारी अभियंता संतोष सोनवणे  यास करकंब येथे राहत्या घरी तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. 

तक्रारदार यांचे शहरातील नवीपेठ येथील कृष्णाच्या हौदाजवळ पानाचे दुकान आहे. हे पान शॉप अतिक्रमणात काढण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणची वीज जोडणी तोडून नवीन ठिकाणी वीज जोडणी  देण्यासाठी तक्रारदाराने महावितरण शाखा पंढरपूरकडे अर्ज केला. त्यानुसार नवीन वीज जोडणी देण्यासाठी सहायक अभियंता जयप्रकाश महादेव कदम (वय 57, प्लॉट.नं. 45, रा. इसबावी, ता.पंढरपूर) याने दि. 29 रोजी 1 हजार रुपयांची मागणी केली होती. या दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानुसार दि. 30 रोजी सकाळी 11.15 वा. पानशॉप येथे 1 हजार रुपयांची लाच स्वीकारली असता सहायक अभियंता कदम यास लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. दुसर्‍या प्रकरणात करकंब शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ संतोष चंद्रकांत सोनवणे (वय 43, रा.पंढरपूर) याला निलंबित केले होते. निलंबनाची ही कारवाई मागे घेण्यासाठी व पोस्टींग देण्यासाठी तक्रारदाराकडून संतोष सोनवणे याने वरवडे ( ता.माढा) येथील वीज उपकेंद्रातील  ऑपरेटर चंद्रशेखर परशुराम जाधव याच्यामार्फत 15 हजारांची लाच करकंब येथे परशुराम जाधव याच्या राहते घरी स्वीकारली. याच वेळी लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून संतोष सोनवणे आणि चंद्रशेखर जाधव या दोघांनाही अटक केली आहे. 

या कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी  अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारकड व त्यांच्या पथकाने केली आहे.