Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Solapur › डॉक्टरांच्या अपहृत मुलाचा मृतदेह संभाजी तलावात 

डॉक्टरांच्या अपहृत मुलाचा मृतदेह संभाजी तलावात 

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 10:25PMसोलापूर  प्रतिनिधी

जालन्यातील एका डॉक्टरांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा सोलापुरात दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी अपहृत मुलाचा मृतदेह विजापूर रस्त्यावरील संभाजी तलावात आढळला. हरिओम राजेश कुटे असे मृताचे नाव आहे.

डॉ. राजेश सुरेश कुटे  (वय 43, रा. शिवनगर, जालना, सध्या रा. म्हाडा कॉलनी, सहयोगनगर, सोलापूर) यांनी मुलाच्या अपहरणाची फिर्याद  15 जून रोजी फौजदार चावडी पोलिसांत दाखल केली होती. 16 जून रोजी सायंकाळाच्या सुमारास पोलिसांना विजापूर रस्त्यावरील संभाजी तलावात अनोळखी मृतदेह आढळला. पोलिसांनी अपहरणकर्त्या मुलाच्या वयाचा आणि वर्णनाचा अंदाज घेऊन डॉ. कुटे यांना बोलावून घेतले. रात्री उशिरा हाच आपला मुलगा असल्याचे डॉ. कुटे यांनी ओळखले.

सोलापुरातील सहयोगनगर येथे राहणारे डॉ. कुटे यांचे भाऊजी जगदीश गार्डी यांच्याकडे मुलगा हरिओम शिकण्यासाठी राहावयास होता. तो जालन्याला जाण्यासाठी  सोलापूर एसटी स्टँडवर गेला असता कोणी अज्ञात व्यक्‍तीने फूस लावून त्याचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मुलाने विजापूर रोडवरील शांती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते. मुलाला दहावीत चांगले मार्क पडल्याने पुढचे शिक्षण दुसरीकडे घ्यावयाचे ठरवले. त्यानुसार भाऊजी गार्डी यांनी डॉ. कुटे यांना कळविले की, हरिओम याला मार्कशीट व दाखल्यासह जालन्याला घेऊन येतो. 

दरम्यान,  14 जून रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादीला डॉ. कुटे यांना पोलिस उपनिरीक्षकाचा सोलापूरहून   फोन आला. पोलिस उपनिरीक्षक यांनी सांगितले की, आपला मुलगा रात्री दोन वाजेपर्यंत रस्त्याने फिरत असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत आणखी तीन मुले असल्याचे सांगितले. मुलाची ओळख पटल्यानंतर त्यास समज देऊन घरी पाठवून द्यावे, अशी डॉ. कुटे यांनी पोलिस उपनिरीक्षक यांना विनंती केली. मात्र दुपारचे चार वाजले तरी मुलगा घरी आला नसल्याचे भाऊजी जगदीश गार्डी यांनी डॉ. कुटे यांना सांगितले. हे कळताच त्यांनी सोलापूर गाठले होते. 

याबाबत तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम जमादार यांनी सांगितले की, बेपत्ता म्हणून मुलाचा तपास चालू होता.  अज्ञात व्यक्‍तीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र रात्री उशिरा मृतदेहच आढळला. पहाटे ज्या मित्रांबरोबर तो फिरताना आढळला होता, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या मित्रांनी सांगितले की, त्याला सहयोगनगर येथे त्याच दिवशी सोडले होते. वडिलांच्या रागावण्याच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज तुकाराम जमादार यांनी व्यक्‍त केला आहे.