Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Solapur › बोरामणी येथे उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन

बोरामणी येथे उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:32PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील बोरामणी गावात चक्काजाम आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी गावकर्‍यांनी दुकाने कडकडीत बंद ठेवून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. 

सकाळी मराठा समाजाच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी शांततेत बंद पुकारुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूकसेवा ठप्प झाली होती. मराठा समाजाच्या भावना ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

समाजाला आरक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी समाजातील विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसचे प्रशिक्षण मिळावे, परदेशी शिक्षणासाठी अनुदान देण्यात यावे, शैक्षणिक कर्ज सुलभ व विनातारण करण्यात यावे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तातडीने वसतिगृह सुरू करण्यात यावे, 605 प्रकारच्या कोर्ससाठी फी सवलत विनाअट देण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात प्रा. राज साळुंखे, कमलाकर भोसले, शाम भोसले, बळी हेबळे, ज्ञानेश्‍वर कदम, जीवन पवार, हणमंत पवार, सोमनाथ पाटील, पोपट पाटील, योगेश कवडे, चन्नवीर मटगे, मल्लू हुक्किरे, रमेश मोहिते, मोहसिन मुजावर, हनिफ पठाण, अनंत भिसे यांच्यासह मराठा व अन्य समाजबांधव सहभागी झाले होता.