होमपेज › Solapur › बोगस नळांबाबत सावळागोंधळ 

बोगस नळांबाबत सावळागोंधळ 

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 8:43PM

बुकमार्क करा

सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

‘जीआयएस’ सर्व्हेअंतर्गत आढळलेल्या 14 हजार 695 बोगस नळांबाबत शहानिशा न करताच नोटिसा बजाविण्याचे काम झोन कार्यालयांकडून सुरू असल्याने मनपाकडे मिळकतदारांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत ‘पोस्टमार्टेम’ करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील जुन्या व नव्या मिळकतींचा सर्व्हे करण्याचा मक्ता सायबरटेक कंपनीला देण्यात आला आहे. या कामांतर्गत मिळकतींचे मोजमाप करतानाच बोगस नळांचा छडा लावण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत या कंपनीने सुमारे 2 लाख मिळकतींचा सर्व्हे केला आहे. यामध्ये 14 हजार 695 बोगस नळ आढळल्याची माहिती कंपनीने मनपाला दिली आहे. या नळांबाबत झोननिहाय आकडेवारींसह माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे झोन कार्यालयांकडून नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. वास्तविक नोटिसा बजाविण्याआधी संबंधित मिळकतीला भेट देऊन शहानिशा करणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता थेट नोटिसा बजाविण्यात येत आहेत.

बोगस नळांबाबत कंपनी तसेच मनपाच्या चुका असल्याचे मिळकतदारांच्या तक्रारींमधून स्पष्ट होत आहे. कारण ज्या मिळकतींमध्ये नळ कनेक्शन नाही अशा अनेक मिळकतदारांकडे नळ असल्याचा ‘जावईशोध’ सायबरटेक कंपनीने लावला, तर दुसरीकडे झोन कार्यालय तसेच कर आकारणी विभागाच्या ‘लाल फिती’च्या कारभाराचे अनेक नमुने समोर येत आहेत. 

एखाद्या मिळकतदाराने झोनकडे रितसर अर्ज व आवश्यक प्रक्रिया करुन नळ घेतल्यावर या झोनकडून याबाबतचे कंम्प्लेशन कर आकारणी विभागाकडे वेळीच करणे अपेक्षित आहे. त्यानंतर कर आकारणी विभागाकडून नळाबाबत पाणीपट्टीची स्वतंत्र किंवा मिळकतकराच्या बिलात आकारणी केली जाते. पण याबाबत झोन व कर आकारणी विभागाच्या चुका निदर्शनास येत आहेत. झोनकडून कंम्प्लेशनची माहिती आली नाही असे काही मिळकतींबाबतची उदाहरणे कर आकारणी विभागाकडून देण्यात येतात, तर दुसरीकडे झोनने वेळीच कर आकारणी विभागाला माहिती सादर केली, पण कर आकारणी विभागाने पुढील आवश्यक प्रक्रिया न केल्याची प्रकरणेही समोर येत आहेत. 

बोगस नळांचा ठपका असलेल्या संबंधित मिळकतदारांकडून रितसर नळ कनेक्शन घेतल्याबाबतची कागदपत्रे तक्रारीसोबत देण्यात येत आहेत. यावरुन झोन तसेच कर आकारणी विभागाचा गलथान कारभार समोर येत आहे. याबाबतची दुरुस्ती तातडीने होणे अपेक्षित आहे. ज्या मिळकतदारांनी बेकायदेशीरपणे नळ कनेक्शन घेतले आहे अशांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे. 

याचवेळी झोन व कर आकारणी विभागांच्या चुकांचा नाहक फटका ज्या मिळकतदारांना बसत आहे अशांना दिलासा देण्याची तसेच अशा प्रकरणांमध्ये कर्तव्यात कसूर केलेल्या महापालिकेच्या संबधित अधिकारी-कर्मचार्‍यांना कडक शासन करण्याची मागणी होत आहे.