Thu, Jun 27, 2019 18:04होमपेज › Solapur › भाजप सभागृह नेत्यावर विषप्रयोग?

भाजप सभागृह नेत्यावर विषप्रयोग?

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 11:20PMसोलापूर :  प्रतिनिधी

महापालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याने या गंभीर प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शुक्रवारी महापालिकेत सभेत विरोधकांनी करीत चर्चेची मागणी केली; मात्र ती महापौरांनी अमान्य केल्याने सभेत प्रचंड गोंधळ झाला. गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली.

जानेवारीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गेले 10 महिने मनपातील सत्ताधारी दोन देशमुख गटांतील वादाने मनपाच्या अनेक सभा वादग्रस्त ठरल्या; मात्र मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर  गेल्या आठवड्यात हे दोन्ही गट एकत्र आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारची सभा कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; मात्र सत्ताधार्‍यांमुळे नव्हे, तर विरोधकांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रकरणामुळे ही सभा लक्षवेधी ठरली. सभेत समांतर जलवाहिनीचा महत्त्वाचा विषय होता. हा विषय घेऊन सभा तहकूब आधीच करण्याचे ठरले होते. सभेच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सभागृहनेते सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगासंदर्भातील विषय घेण्याची आग्रही  मागणी केली. यानंतर कामकाजाला सुरुवात होताच नरोटे तसेच बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप करीत याच्या चौकशीची लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करीत विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत ना.स. फरांदे यांच्या निधनानिमित्त दुखवट्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे खवळलेल्या विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. याच गोंधळात महापौरांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली. यानंतर सभेत शिवसेना वगळता उर्वरित सर्वच विरोधी पक्षांनी महापौरांच्या धिक्काराच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

सत्ताधार्‍यांवर विरोधकांचा हल्लाबोल

सभा तहकूब झाल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसप, माकपचे गटनेते व नगरसेवक हे स्थायी समितीच्या सभागृहात एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यु.एन. बेरियादेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी या सर्वपक्षीय गटेनेत्यांनी पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगासंदर्भातील विषय सत्ताधार्‍यांनी सभेत न घेतल्याबद्दल हल्लाबोल केला.

 गंभीर विषय न घेणे खेदजनक : बेरिया 

यावेळी बोलताना यु.एन. बेरिया म्हणाले, सभागृहनेते पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याची बाब समोर आली आहे. या गंभीर विषयावर सभेत चर्चा होणे अपेक्षित असताना महापौरांसह सत्ताधार्‍यांना या विषयाचे गांभीर्य नाही, हे खेदजनक आहे. विषयप्रयोगाची गुन्हा अन्वेषण विभाग किंवा सीआयडीमार्फत चौकशी व्हावी. महापौरांनी सभा तहकुबीचा उच्चांक मांडला असे म्हणत बेरिया यांनी पाटील यांचा विषय न घेणे हे सत्ताधार्‍यांच्यादृष्टीने नामुष्की आहे, या शब्दांत टीका केली.

महापौरांना सत्तेचा माज : नरोटे

सुरेश पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकावर झालेल्या विषप्रयोगाबद्दल महापौरांना काहीच गांर्भीय नसल्याचे दिसून येेते. त्यांना सत्तेचा माज आला आहे. पाटील यांच्याविषयी त्यांना आदर नसल्याचे यानिमित्ताने दिसून येते. पाटील यांच्यासारख्या उगवत्या नेतृत्वावर विषप्रयोग करुन त्यांना संपविण्याचा घाट घालण्यात आला आहे. असा  प्रयोग  कोणावरही होऊ शकतो. पाटील हे सभागृहाचे शान आहेत. आम्ही पक्षभेद विसरुन या गंभीर विषयाबाबत त्यांच्यासमवेत आहोत.

मुख्यमंत्र्यांना भेटणार : शेख

पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगातून घातपातीची शक्यता दिसून येते. याप्रकरणी पोलिस आयुक्तांबरोबरच मुख्यमंत्र्यांना भेटून याप्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात येणार आहे, असे एमआयएमचे गटनेते तौफिक शेख यावेळी म्हणाले. हा विषय महापौरांनी चर्चेला घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे न करण्याची चूक केली आहे. सभागृहाच्या भावना त्यांनी लक्षात घेतल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

महापौरांची मनमानी : चंदनशिवे

आजच्या सभेत महापौरांनी पाटील यांच्यासंदर्भात आम्ही मांडलेल्या लक्षवेधीकडे दुर्लक्ष करुन मनमानी व राजकारण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. या विषयाची चौकशी होऊन याची माहिती मनपा सभागृहापुढे यावी. याविषयी पक्षभेद बाजूला ठेवण्याची आमची भूमिका आहे. याप्रसंगी राष्टवादीचे गटनेते किसन जाधव व माकपच्या कामिनी आडम यांनीदेखील आपल्या भावना मांडल्या.