Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Solapur › भाजी विक्रेत्याला मारहाण करून जबरी चोरी; दोघांवर गुन्हा दाखल

भाजी विक्रेत्याला मारहाण करून जबरी चोरी; दोघांवर गुन्हा दाखल

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 9:03PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील हॉटेल पॅराडाईज येथे भाजी विक्रेत्या तरुणास मारहाण करुन  दुचाकी  पेटवून  देऊन 470 रुपये जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या दोघांविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भैय्या पाटील व त्याचा मित्र चेतन (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विजय प्रकाश वाघमोडे (वय 32, रा. शिवाजीनगर, बाळे) याने फिर्याद दाखल केली आहे.

विजय वाघमोडे हा भाजी विक्रेता असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो शिवाजीनगर येथील हॉटेल पॅराडाईज येथे थांबला होता. त्यावेळी भैय्या पाटील व त्याचा मित्र चेतन हे दोघेजण आले. त्यांनी वाघमोडे यास शिवीगाळ करुन मारहाण करुन जबरदस्तीने वाघमोडे याच्या खिशातील 470 रुपये काढून घेतले. त्यानंतर भैय्या पाटील व त्याचा मित्र चेतन याने वाघमोडे यांची दुचाकी क्र. एमएच 13 सीई 9120 या दुचाकीवर मोठा दगड घालून गाडीतील पेट्रोल काढून घेतले. त्यानंतर भैय्या पाटील याने वाघमोेडे याच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली आणि त्यानंतर जर याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली तर बघून घेईन अशी धमकी देऊन निघून गेला म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक डोके तपास करीत आहेत. सोलापूर शहरात मागील काही दिवसांत किरकोळ व्यापार्‍यांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून  येत आहे.