Thu, Jun 27, 2019 01:56होमपेज › Solapur › 651 कोटींवर बाजार समितीची उलाढाल!

651 कोटींवर बाजार समितीची उलाढाल!

Published On: Dec 18 2017 2:44AM | Last Updated: Dec 17 2017 11:35PM

बुकमार्क करा

सोलापूर ः संतोष आचलारे

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीची सन 2016-17 या आर्थिक वर्षात एकूण 651 कोटी रुपयांची उलाढाल झाली असून चालू वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत 515 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समितीला गतवर्षी 6 कोटींचा निव्वळ नफा मिळाला असून सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ही संस्था राज्यासाठी आदर्शवत अशी ठरली गेली आहे. बाजार समितीवर नेमलेल्या प्रशासकीय यंत्रणेकडूनही चांगली कामगिरी दिसून येत असून यामुळे बाजार समितीचा लौकिक वाढला गेला आहे. 

महाराष्ट्रात गत 60 वर्षांपासून सहकार क्षेत्राचे मोठे जाळे उभारण्यात आले होते. सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने, सूत गिरणी, दूध डेअरी, हॉस्पिटल आदी विविध संस्थांची पायाभरणी याकाळात झाली. 1990  पर्यंत सहकारी संस्थेचे अत्यंत चांगले काम दिसून येत होते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणार्‍या संस्थेतून अनेक लोकांचा उध्दार होत होता. मात्र 1990 नंतर अनेक सहकारी संस्थेत राजकारण शिरल्याने व संचालक मंडळाच्या सदोष कारभारामुळे अनेक सहकारी संस्था बुडीत निघाले. आज सहकारी संस्था म्हटले की सर्वसामान्यांत नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. 

शेतकर्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने, दूध डेअरी, पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सोयायटी आदी संस्थांची आज सर्वत्र वाताहत लागलेली दिसून येत आहे. या संस्थेतील भोंगळ कारभाराचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. सहकारी वारसा चालविणारे लोकच खासगी वारसा पुढे रेटल्याने सध्या शेतकर्‍यांना मालकशाहीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समिती ही संस्थादेखील शेतकर्‍यांसाठी 1959 मध्ये स्थापन करण्यात आली. 1961 ला या बाजार समितीचे कामकाज सुरु झाले. आज 58 वर्षांच्या इतिहासात या संस्थेला तोटा झाल्याचे दिसून आला नाही. मागील काही संचालक मंडळाच्या कारभाराबाबत टीका असली तरीही या सर्व धक्क्यातून बाहेर येत बाजार समिती नफ्यात राहिली गेली आहे. 

बाजार समितीच्या उभारणीसाठी तत्कालीन दिवंगत नेते वि.गु. शिवदारे, बाबुराव चाकोते, ब्रह्मदेवदादा माने, भीमराव पाटील-वडकबाळकर आदींचे मोठे योगदान आहे. अलीकडच्या काळात महादेव चाकोते, दिलीप माने, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा-पाटील आदी सभापतींनीही या संस्थेचा कारभार चांगला ठेवला आहे. त्यामुळेच ही संस्था टिकून आहे. अलीकडच्या काही वर्षात संचालक मंडळाची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता थेट शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे.बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे, सचिव विनोद पाटील यांच्याकडूनही बाजार समितीचा गाडा सुरळीत रेटण्यात येत असल्याचे दिसून येते. कांदा बाजारातील उलाढालीने राज्यात नावलौकिक निर्माण झाला आहे. कांदा चोरी रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना सुरु करण्यात आले आहेत. यासाठी शंभर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. बाजार समितीमधील आडतदार, हमाल व कर्मचार्‍यांना तीन हजार ओळखपत्र देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे बाजार समितीमधील होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मदत होणार आहे. 

प्रशासकीय यंत्रणेवर शेतकर्‍यांचा भरवसा निर्माण होत असून त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकर्‍यांना हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु करणे, शेतकर्‍यांच्या मालाची सुरक्षा करणे, शेतकर्‍यांसाठी निवास व रोख पट्टीची व्यवस्था करणे, किमान मुलभूत सुविधा पुरविणे आदी अपेक्षा शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहेत.