Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Solapur › बसवेश्‍वर स्मारक  आराखडा तातडीने द्या

बसवेश्‍वर स्मारक  आराखडा तातडीने द्या

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 8:56PMसोलापूर : प्रतिनिधी

जगद्ज्योती महात्मा बसवेश्‍वर यांच्या स्मारकाबाबतचा आराखडा येत्या पंधरा दिवसांत राज्य शासनाकडे पाठवावा. यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने विहीत केलेल्या धोरणातील तरतुदींचा अवलंब करावा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.

जगद्ज्योती महात्मा बसवेश्‍वर स्मारक समितीची पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ना. देशमुख यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, समिती सदस्य माजी आमदार गंगाधर पटणे, मनोहर पटवारी आदी उपस्थित होते.

ना. देशमुख यांनी सांगितले की, स्मारकाच्या उभारणीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार आराखडा येत्या पंधरा दिवसांत तयार करावा. तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करावा. यासाठी महात्मा बसवेश्‍वर यांच्या कर्नाटकात असलेल्या स्मारकांची पाहणी करावी. त्याचबरोबर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मते विचारात घ्यावीत.

 स्मारकासाठी कृषी विभागाने जमीन देऊ केली आहे. त्यामुळे आता या स्मारकाच्या विकासात कृषी विभागाचाही सहभाग करून घेतला जाईल. स्मारकाची उभारणी झाल्यावर त्याची देखभाल आणि सनियंत्रण स्थानिक संस्थेकडे अथवा नगरपरिषदेकडे देता येईल, असे ना. देशमुख यांनी सांगितले.   

माजी आमदार गंगाधर पटणे यांनी स्मारकाच्या उभारणीसाठी प्राधिकरण स्थापन केले जावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून नियोजन विभागाला सादर करावा. आराखडा ग्रामविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार केला जावा, असे सुचवले.

 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी कृषी विभागाची जमीन दिली जाईल, त्यातील काही भाग स्मारकासाठी, तर उर्वरित भागात कृषी पर्यटन आणि संशोधन केंद्र विकसित केले जावे, अशा सूचना असल्याचे सांगितले.

 यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांन स्मारक समितीच्या कामकाजाबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात यावा, अशा     सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, समिती सदस्य गुरूनाथ बडुरे, उदय चोंडे, पुरातत्त्व खात्याचे एच.जे. दसरे, नगररचना विभागाचे प्रभाकर वाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता सुरेश राऊत आदी उपस्थित होते.

बसवेश्‍वरांच्या जीवनातील महत्त्वाचा काळ हा मंगळवेढा परिसारात गेला आहे. त्यामुळे बसवेश्‍वरांच्या स्मारकासंदर्भात अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला जात होता, पण त्या मागणीला काही यश आले नाही. आता पालकमंत्र्यांनी सूचना दिल्याने विषय चर्चेत आला आहे.