Wed, Apr 24, 2019 07:49होमपेज › Solapur › पुनर्वसनात गैरव्यवहार झाल्याचा होतोय आरोप

पुनर्वसनात गैरव्यवहार झाल्याचा होतोय आरोप

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 11:03PMबार्शी : गणेश गोडसे

तांदुळवाडी (ता. बार्शी) येथील गावाच्या पुनर्वसनाचे काम हे अठरा वर्षांनंतरही अपूर्णावस्थेतच राहिले असल्यामुळे ग्रामस्थ व सर्वसामान्य जनतेसह ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांमधूनही याबाबत शंका- कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. संबंधित विभागाच्या अधिकारी व प्रशासनाने उर्वरित पुनर्वसनाची कामे मार्गी न लावल्यामुळे तसेच विविध नागरी सुविधांकरीता गावठाणात राखीव ठेवण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार तांदुळवाडीच्या सरपंचांनी एका लेखी निवेदनाद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. तांदुळवाडी गावच्या महिला सरपंच रूपाली विकास गरड यांनी चक्क गैरव्यवहार झाल्याचा धाडसी आरोप करत जिल्हाधिकार्‍यांकडेच तक्रार केलेली असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांमध्येही खळबळ उडाली आहे.  ढाळे-पिंपळगाव या मध्यम प्रकल्पाच्या निर्मितीमुळे जुने तांदुळवाडी गाव बर्‍यापैकी पाण्याखाली आल्यामुळे तांदुळवाडीचे पुनर्वसन करणे शासनास बंधनकारक ठरले होते. मात्र नवीन वसाहतीत ग्रामस्थांना गरजेच्या असलेल्या नागरी सुविधा मात्र  वर्षानुवर्षे प्रतीक्षेत  आहेत. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी जनतेस यादीनुसार प्लॉटचे वाटप केले, पण नागरी सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या क्षेत्राचे जाणिवपूर्वक मोजमाप करण्यात आलेले नाही.

महिला सरपंचांनी गावठाण नकाशाची पाहणी केली असता अनेक प्रकार उजेडात आले आहेत. नकाशाच्या पहाणीनंतरच गैरव्यवहाराची बाब उजेडात आली आहे. गावातील काही ठराविक मंडळींना हाताशी धरून नागरी सेवा सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या क्षेत्रातील जागा आपल्या घशात घालण्याचा गोरख धंदा करण्यात आला आहे. काहींनी तर बळकावलेल्या प्लॉटचा वापर शेतीसाठी केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरपंचांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडेच तक्रार करून यावर न्याय देण्याची मागणी केलेली आहे.