Fri, Jul 19, 2019 18:02होमपेज › Solapur › जुना पुणे नाक्यावर तीन तास चक्‍काजाम 

जुना पुणे नाक्यावर तीन तास चक्‍काजाम 

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:09PMसोलापूर : पुढारी चमू

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी गुरुवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे जुना पुणे नाका येथे तब्बल तीन तास रास्ता रोको करत चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले.
ऑगस्ट क्रांतिदिनाच्यानिमित्ताने गुरुवारी राज्यभर महाराष्ट्र बंद आंदोलन सुरु असताना सोलापुरात मात्र गेल्याच आठवड्यात सोलापूर बंद आंदोलन करण्यात आल्यामुळे बंद न पाळता तीन तास चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास जुना पुणे नाका येथे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जमले. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी आसमंत दणाणला. 

मराठा आरक्षण मोर्चाचे बॅनर घेऊन आंदोलकांनी छत्रपती शंभूराजेंच्या सर्कलला दोन प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर पुतळ्याच्या चौथर्‍याजवळ येऊन जिजाऊ वंदना प्रार्थना करण्यात  आली आणि मग रस्त्याच्या मध्यभागी बसत आंदोलन सुरु झाले. पुणे महामार्गावरून सोलापुरात प्रवेश करणारा मार्ग पोलिसांनी पुलाच्या वरच्या बाजूलाच अडविला, तर सोलापुरातून पुणे महामार्गाला जोडणारा मार्ग हॉटेल अ‍ॅम्बॅसिडर येथेच अडवून त्यांना पर्यायी मार्ग दिला. त्यामुळे चक्काजाम, रास्ता रोको आंदोलनाच्या काळात दुचाकी वाहनेसुध्दा छत्रपती संभाजीराजे पुतळ्याच्या चौकात येऊ शकली नाहीत. 
सुमारे दीड-दोन तास रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी एकच्या सुमारास रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. तरी सुमारे अर्ध्या तासाने सर्व आंदोलक चौकातून पांगल्यानंतर पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला व वाहतूक पूर्ववत सुरु झाली. यावेळी दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, भैय्या धाराशिवकर, श्रीकांत घाडगे, महेश धाराशिवकर, तुकाराम नाना मस्के, शशी थोरात, शहाजी पवार, इंद्रजित पवार, समर्थ कदम, किरण पवार, राम जाधव, शेखर फंड, विजय पुकाळे उपस्थित होते.  

महिलांची लक्षणीय गर्दी
चक्काजाम  आंदोलनात सुमारे पाचशे आंदोलकांची गर्दी होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’ करत सहभागी झालेल्या महिला व तरुणींनी पुरुष आंदोलकांच्याबरोबरीने केलेले चक्काजाम आंदोलन लक्ष वेधून घेत होते.

महादेवाच्या पिंडीवर रक्‍ताभिषेक
काही तरुणांनी आंदोलनाच्या स्थळी छोटी महादेवाची पिंड आणली. छोट्या टेबलवर भगव्या वस्त्रावर ती पिंड ठेवली आणि अंगठ्याला ब्लेड, टाचण्या मारून त्या पिंडीला रक्ताने अभिषेक केला. अनेकांच्या बोटांच्या रक्ताचे थेंब पिंडीवर सांडल्याने महादेवाची पिंड आज क्रांतिदिनी रंगाने माखली.

मुस्लिम व दलित संघटनांचा पाठिंबा
चक्काजाम आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेना, मुस्लिम संघटना  तसेच दलित संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. 

पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन केले. दोन तास शांततेत आंदोलन पार पडल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मागील सोलापूर बंदच्या काळात    पोलिस उपायुक्‍तांच्या गाडीसह तीन पोलिस व्हॅनसह एका खासगी कारवर आणि एका हॉटेलवर दगडफेक झाली होती. त्यामुळे गुरुवारच्या ठिय्या आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताचा मोठा ताण आला होता. मात्र मराठा समाजबांधवांनी शांततेत आंदोलन केल्याने किरकोळ घटना वगळता आंदोलन शांततेत झाले. सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच संभाजी चौक, शिवाजी चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कमांडोसह अश्रूधुराची नळकांडी फोडणारे, अग्निशमक दल, कमांडोज तैनात केले होते. पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त  अभय डोंगरे, दीपाली काळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  सूर्यकांत पाटील, फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक संजय जगताप बंदोबस्तावर नजर ठेवून सूचना देत होते. संभाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर गर्दी जमत गेल्यानंतर पुणे रस्त्यावरुन शहरात येणारी वाहतूक बंद करुन रुपाभवानी मंदिरापासून आणि सम्राट चौकातून वाहतूक वळविण्यात आली. कोंडीत जवळपास 200 मराठा समाजबांधवांनी शेती अवजारे, बैलगाड्या लावून  अर्धा तास रास्ता रोको केला. बाळे पोलिस चौकी, फौजदार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलकांना हटवून रस्ता मोकळा केला. काही आंदोलकांनी संतापून मुख्यमंत्री, पंतप्रधान, महसूलमंत्री यासह विविध मंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा देऊ लागल्यानंतर त्यांच्या नोंदी विशेष शाखेकडून केल्या जात होत्या. विशेष शाखेसह गुन्हे शाखेची आंदोलनावर करडी नजर होती.

सोलापूर व्यापारी असोसिएशन अध्यक्षांच्या दुकानावर दगडफेक 
छत्रपती संभाजी महाराज चौकातील ठिय्या आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर परतताना काही हुल्लडबाजांनी नवी पेठेतील व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांच्या दुकानावर दगडफेक केली.
नवी पेठेतील जीवनदीप ट्रॅव्हल्सच्या बाजूला असलेल्या अशोक मुळीक यांच्या दुकानावर अज्ञातांनी दगडफेक केली. यात दुकानाच्या काचांना तडा गेला, तर काही काचा फुटल्या. ही बातमी वार्‍यासारखी शहरात पसरली. घटना कळताच त्वरित पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, संजय जगताप पथकासह, कमांडोसह घटनास्थळी दाखल झाले.


जि.प.समोर मूक आंदोलन
सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद गेटसमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत बलिदान दिलेल्या लोकांना समाजाच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत मिळावी, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय करावी अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने आजपर्यंत अनेक मार्गांनी आंदोलने व मोर्चे काढण्यात आले. मात्र याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गुरुवारी शासनाच्या निषेर्धात गुरुवारी मूक आंदोलन करण्यात आले.  शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आजपर्यंत मराठा समाजातील अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असून त्या लोकांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. शासनाने समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये यासाठी तत्काळ आरक्षणाचा मुद्दा संपवावा, अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली. यावेळी माऊली पवार, सुहास कदम, राजन जाधव, श्याम कदम, शहाजी पवार, दत्ता मुळे, प्रवीण डोंगरे, बळीराम साठे, प्रल्हाद काशीद, संतोष पवार, भारत जाधव, ज्ञानेश्‍वर सपाटे, शहाजी घाटगे, जयकुमार माने, भाऊसाहेब रोडगे, शहाजी भोसले, धनाजी भोसले, विष्णू भोसले यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या.

बार असोसिएशनचा मूक आंदोलनाला पाठिंबा 
सोलापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या मूक आंदोलनाला बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर, सुरेश गायकवाड, संतोष पाटील, जयदीप माने, आसिफ शेख यांनी निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला.